नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चांगली कामे होत असली तरी त्याचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. अशाप्रकारे सायबर क्राईमचे गुन्हे गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहेत. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला आणि तरुण मुलींची फसवणूक करून त्यांचा लैंगिक छळ करणार्या घटनांचा समावेश आहे. त्यामुळे पोलिसांपुढे सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. अशीच एक घटना दिल्ली परिसरात घडली असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
लग्नाच्या वेबसाइटवर तरूण मुलींशी मैत्री करून फसवणुकीचे जाळे फेकणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने अनेक राज्यातील तब्बल 100 हून अधिक मुलींची फसवणूक केली आहे. फरहान तासीर खान (वय 35) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे बीएमडब्ल्यू कार आहे. शिवाय तो मुलींना प्रभावित करण्यासाठी ब्रँडेड कपडेही घालायचा.
मोठा उद्योगपती आणि अविवाहित असल्याचे तो मुलींना सांगायचा. पोलिसांनी त्याच्याकडून BMW X1 कार, नऊ डेबिट कार्ड, चार सिम, स्मार्टफोन्स आणि महागडे घड्याळ जप्त केले आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एम्सच्या महिला डॉक्टरने मार्चमध्ये जीवनसाथी या वेबपोर्टलवर एका व्यक्तीला भेटल्यानंतर फसवणुकीची तक्रार केली होती. आरोपीने स्वतःला अविवाहित असल्याचा दावा केला होता. याबाबत दोघांमध्ये चर्चा होऊन वाद सुरू झाला.
महिला डॉक्टर सोबत प्रेमाचे खोटे नाटक करून त्याने मोठा व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली 15 लाख रुपये घेऊन तो फरार झाला होता. सायबर पोलिस स्टेशनचे प्रभारी अरुणकुमार वर्मा यांच्या देखरेखीखाली पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासात समोर आले की, आरोपीने वेगवेगळ्या मॅट्रिमोनिअल साइटवर अनेक बनावट प्रोफाइल तयार केले होते. तसेच तो दिल्लीसह इतर शहरातील मुलींशी मैत्री करत असे.
फरहान हा व्हीआयपी क्रमांकाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये मुलींना भेटत असे. याचा फटका मुलींना बसला. त्याला एकटे समजून मुलींनी त्याच्याशी लग्न करण्यास होकार दिला. व्यवसाय करण्यासाठी तो मुलींकडे पैसे मागायचा आणि पैसे घेऊन गायब व्हायचा. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी तो एसी ट्रेन आणि विमानाने प्रवास करत असे.
मूळचा तकियानपारा दुर्ग छत्तीसगडचा रहिवासी असलेला फरहान तासीर खान सध्या ओडिशामध्ये राहत होता. सदर आरोपी हा बारावी पास आहे. 2015 मध्ये त्याचे लग्न झाले आहे. त्याला 3 वर्षांची मुलगीही आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी, वडील व एक विवाहित बहिण आहे. आरोपीने अनेक प्रोफाईल सांभाळले होते. तसेच त्याने प्रोफाइलमध्ये आपली पात्रता, उत्पन्न, मालमत्ता, कुटुंबातील सदस्य आणि वैवाहिक स्थिती याबाबत खोटी माहिती दिली होती. याप्रकरणी आता सायबर पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत.