पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरू पाहणाऱ्या चोराचा कट उधळून लावणाऱ्या दहा वर्षीय धाडसी मुलीचा व्हिडिओ सध्या बराच गाजतोय. ही घटना पुणे येथील असून या मुलीच्या साहसी कृत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
पुण्यात आजी आपल्या दोन नातींबरोबर रस्त्यावरून जात होत्या. त्याचवेळी समोरून एक दुचाकीस्वार आला आणि तो पत्ता विचारण्याच्या निमित्ताने आजींच्या जवळ आला. त्याने बोलायला सुरुवात केली आणि यानंतर आजींनीही तो करत असलेल्या चौकशीला प्रतिसाद देत त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली. याच संधीचा फायदा घेत या साखळचोराने आजींच्या गळ्यातील दागिने ओरबाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर आजी सावध झाल्या आणि त्यांनी साखळीचोराचा प्रतिकार केला.
अचानकपणे आजीवर झालेला हा हल्ला त्यांच्यासोबत रस्त्याच्या फुटपाथवरून चालणाऱ्या १० वर्षीय नातीने पाहिला. तिने तात्काळ प्रसंगावधान राखत तिच्या हातातील बॅगने साखळीचोरावर हल्ला चढवला. चोराने आधी प्रतिकार करत दागिने ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजींसह नातीनेही चोरावर हल्ला चढवल्याने चोर भांबावला आणि त्याने दागिने न चोरताच पळ काढला. या प्रकारानंतर १० वर्षीय मुलीच्या धाडसाचं चांगलंच कौतुक होत आहे.
नात घाबरली नाही
खरं तर लहान मुलांना चोरांची प्रचंड भिती असते. त्यातही भर रस्त्यावर कुणी चोरीचा प्रयत्न केला, तर लहान मुलं घाबरून जातात. पण आजींची दहा वर्षांची नात घाबरली नाही. आपण हल्ला केला तर चोर पळून जाईल की तो प्रतिहल्ला करेल, याचा विचार न करता आजीला वाचविण्यासाठी नातीने चोराला मारायला सुरुवात केली. तिच्या या हिंमतीने लहान मुलांना प्रसंगावधान बाळगण्याचाच धडा दिला आहे.
https://twitter.com/ANI/status/1633986221956374528?s=20
10 Year Old Girl Attack on Chain Snatcher Video Viral