इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना चाचणी करण्यासाठी गेलेल्या तरूणीच्या घशातील स्वॅब घेतल्यानंतर गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार दीड वर्षापूर्वी समोर आला होता. अमरावतीतील बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ही घटना घडली होती. या घटनेतील तीस वर्षीय आरोपी टेक्निशियन अलकेश देशमुख याला दहा वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दीड वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने थैमान घातले होते. या संसर्गावर वेळीच उपचार करण्यासाठी कोरोना चाचणी करून घेण्यावर भर दिला जात होता. अमरावतीतील बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जुलै २०२०मध्ये एक २४ वर्षीय तरूणी चाचणीसाठी गेली होती. तिच्या ऑफिसमधील सहकारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने ती ही चाचणी करणार होती. स्वॅब घेणाऱ्या आरोपीने तरूणीला परत केंद्रावर बोलावले आणि तुमची चाचणी पॉझिटीव्ह आली असून, युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले. यावर महिला कर्मचारी नाहीत का, असा प्रश्न तरूणीने व तिच्या मैत्रिणीने विचारला पण त्यावर आरोपीने नाही असे उत्तर दिले. तिच्या गुप्तांगातील स्वॅब घेत त्यानंतर टेस्ट निगेटीव्ह आल्याचे सांगितले. या प्रकरणाने तरूणीच्या मनात शंका निर्माण झाली आणि याबाबत तिने आपल्या भावाला विचारले. अशाप्रकारे कोरोना चाचणी होत नसल्याचे त्याने सांगताच तरूणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ही बाब समोर आल्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली. पोलिसांनी अलकेश देशमुख याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात खटला चालला. त्यात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून अलकेशला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.