मुंबई – नोकरी किंवा व्यवसाय करताना भविष्यातील तरतूद करणे आवश्यक असते. कारण सेवानिवृत्तीनंतर आर्थिक मिळकत कमी होते आणि औषध पाण्याचा खर्च वाढतो. आपल्याला दरमहा १० हजाराची पेन्शन मिळवायची असेल तर सरकारने आणलेल्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येईल.
म्हातारपण हे एक न बदलणारे सत्य असून ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येते. त्यामुळे प्रत्येकाने आपले सेवानिवृत्त आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करावी. सेवानिवृत्ती सुरक्षित ठेवायची असेल तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत पती -पत्नी स्वतंत्र खाती उघडून दरमहा १० हजार रुपये पेन्शन मिळवू शकता. असंघटित क्षेत्रातील कामगारांवर केंद्रित भारतातील नागरिकांसाठी ही एक चांगली पेन्शन योजना आहे. १८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन मिळवू शकतो. या योजनेमध्ये ठेवीदारांना वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते. या अटल पेन्शन योजनेच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊ या …
अटल पेन्शन योजनेअंतर्गत ठेवीदारांना मासिक पेन्शन किमान १ ते ४ हजार आणि कमाल ५ हजार रुपयांपर्यंत मिळू शकते. एखाद्या व्यक्तीने दरमहा २१० रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला वार्षिक ६० हजार रुपये पेन्शन मिळू शकते म्हणजे दरमहा पाच हजार रुपयांपर्यंत. तथापि, ही गुंतवणूक वयाच्या १८ व्या वर्षापासून व्यक्तीने करावी लागते.
सुमारे १० हजार रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी पती -पत्नी दोघांनाही या योजनेअंतर्गत त्यांचे खाते उघडावे लागेल.
पती ३० वर्षांचा असेल, तर त्याला ५ हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा त्याच्या एपीवाय खात्यात ५७७ रुपये जमा करावे लागतील. त्याच वेळी पत्नी २५ वर्षांची असेल, तर तिला दरमहा ३७६ रुपयांचे योगदान द्यावे लागेल. पती -पत्नी दोघांनाही संयुक्तपणे १० हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. मासिक पेन्शन व्यतिरिक्त, जर पती -पत्नींपैकी एकाचा मृत्यू झाला तर हयात असलेल्या जोडीदाराला योजनेअंतर्गत ८ लाख ५० हजार रुपये मिळतील. यासह, त्याला दरमहा पेन्शन मिळत राहील.
अटल पेन्शन योजनेचे खाते उघडण्याची प्रक्रिया अशी आहे. बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा जिथे व्यक्तीचे बचत खाते आहे किंवा खाते उपलब्ध नसल्यास नवीन बचत खाते उघडा. त्यानंतर बँक किंवा पोस्ट ऑफिस बचत बँक खाते क्रमांक द्या आणि बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने APY नोंदणी फॉर्म भरा. तसेच आधार व मोबाईल नंबर द्यावा, मात्र हे अनिवार्य नाही, मासिक, तिमाही, अर्धवार्षिक योगदान हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक रक्कम बचत बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस बचत बँक खात्यात ठेवण्यास सुनिश्चित करावी.