नाशिक – सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात इयत्ता 10 वीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा आणि उच्च माध्यमिक 12 वीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे लेखी व प्रात्याक्षिक परिक्षांचे आयोजन जाहीर करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्य.शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी लेखी परीक्षेचा कालावधी 16 सप्टेंबर 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत असून प्रात्याक्षिक परीक्षेचा कालावधी 15 सप्टेंबर 2021 ते 4 ऑक्टोबर 2021 असा आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) लेखी परीक्षेचा कालावधी 22 सप्टेंबर 2021 ते 08 ऑक्टोबर 2021 पर्यंत असून प्रात्याक्षिक परीक्षेचा कालावधी 21 सप्टेंबर 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 पर्यंत असणार आहे. वरील नमूद परीक्षा कालावधीत विद्यार्थी, पालक, माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख व परीक्षा संचालनासाठी कार्यान्वित असलेले शासकीय अधिकारी ,कर्मचारी आणि शासकीय कार्यालये यांना परीक्षेचे वेळेपत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, ऐनवेळी अपघात झाल्यास त्यासंबंधी कोणती कार्यवाही करावी, आऊट ऑफ टर्न, प्रात्याक्षिक परीक्षा, परीक्षेसंबंधी अन्य माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी मदतवाहिनीची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच परीक्षा काळात नैसर्गिक व आपत्कालीन प्रसंगी येणाऱ्या अडी-अडचणींची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी सदर मदतवाहिनीचा उपयोग करुन शकतात. त्यामुळे परीक्षा कालावधीत परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडी अडचणींचे निरसन करण्यासाठी सर्व संबंधितांनी 0253-2950410 या मदत वाहिनीवर सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत संपर्क साधावा असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.