कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा): हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथील श्री पाराशर हायस्कूल या शाळेतील इयत्ता दहावी चा विद्यार्थी प्रसाद संजय जाधव याने आज “डे विथ कलेक्टर” उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत प्रशासकीय कामकाजाचे धडे गिरवले…. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकांमध्ये प्रसादने उपस्थित राहून कामकाजाची माहिती घेतल्याचे पाहून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याच्या जिज्ञासू वृत्तीचे व या उपक्रमाचे कौतुक केले.
वयाच्या मानाने प्रसादची उंची सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. याचा उपचार भारतामध्ये होत नसून परदेशात होत असल्याची माहिती त्याच्या शिक्षिका स्वाती कोकीतकर यांनी दिली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसादच्या उंची वरील उपचारासाठी त्याला परदेशात पाठविण्याबाबत सहकार्य करण्यात येईल,असे सांगितले.
शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, अभ्यासाची सवय लागावी. तसेच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी आणि ‘जिल्हाधिकारी’ यांच्या करिअर व कार्याची माहिती घेवून यातून त्यांना प्रेरणा मिळावी. तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “डे विथ कलेक्टर” हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत निवड केलेल्या एका विद्यार्थ्यासोबत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हाधिकारी संवाद साधणार आहेत. उत्सुक, प्रज्ञावंत आणि विशेष मुलांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याची संधी या उपक्रमाने मिळणार आहे.
या उपक्रमाची पहिली संधी मिळालेला प्रसाद जाधव हा दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो. प्रसादने मागील 3 वर्षामध्ये भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच त्याने वक्तृत्व स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत. सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रसादला भावी जीवनात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे. आजच्या “डे विथ कलेक्टर” उपक्रमात त्याने आज सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार यादव, पर्यवेक्षिका सुरेखा रोकडे, आई-नम्रता व वडील संजय जाधव यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले आहे. तसेच विज्ञान शिक्षिका स्वाती विनायक कोकीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने तिन्ही वर्षी विज्ञान उपकरणे तयार करुन ती प्रदर्शनात सादर केली होती.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “डे विथ कलेक्टर” या उपक्रमाबरोबरच जिल्ह्यातील शालेय स्तरावरील शिक्षकांसाठी “कॉफी विथ कलेक्टर” हा अभिनव उपक्रमही राबविण्यात येणार आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दुपारी 2 ते 3 या वेळेत होणाऱ्या या उपक्रमात निवड केलेल्या शाळेतील शिक्षकांसोबत जिल्हाधिकारी श्री. येडगे संवाद साधणार आहेत.