नवी दिल्ली – आपल्या देशात दर महिन्याच्या एक तारखेला काही ना काही बदल किंवा नवे नियम लागू होत असतात. त्याच धर्तीवर एक सप्टेंबरपासून स्मार्टफोन, रिचार्ज आणि डिजिटल प्लॅटफॉर्मशी निगडित काही बदल होत आहेत. यापैकी काही बदलांमुळे तुमचा खर्च वाढू शकतो, तर काही बदल तुमच्या सुरक्षेसाठी केले जात आहेत. त्यामुळे या सगळ्या बदलांची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तर चला मग एक सप्टेंबरपासून तंत्रज्ञानामध्ये काय काय बदल होणार आहेत ते पाहूया.
Disney+ Hotstar महाग
एक सप्टेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नीप्लस हॉटस्टारचा वापर महाग होणार आहे. यामध्ये सर्वात कमी किमतीचा ३९९ रुपयांचा प्लॅन आता ४९९ रुपयांना मिळणार आहे. दोन स्मार्टफोनमध्ये या अॅपचा वापर करताना तुम्हाला १०० रुपये अतिरिक्त अदा करावे लागणार आहेत. १४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ४ वेगवेगळ्या डिव्हाइसवर अॅपला अॅक्सेस करता येणार आहे.
बनावट अॅपवर बंदी
गुगलच्या नव्या धोरणानुसार एक सप्टेंबरपासून चुकीचे आणि बनावट कंटेट प्रमोट करणार्या अॅपवर बंदी घालण्यात येणार आहे. ही माहिती गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहे. अनेक दिवसांपासून वापर न झालेल्या अॅप बंद केले जाणार आहेत, असे गुगलने स्पष्ट केले आहे.
फसवणूक करणा-या अॅपवर बंदी
गुगल आपल्या प्ले स्टोअर अॅपसाठी १५ सप्टेंबर २०२१ पासून नवे नियम लागू करत आहे. त्याअंतर्गत कर्जाच्या नावावर लोकांची फसवणूक करणारे शॉर्ट पर्सनल लोन अॅप बंद केले जाणार आहेत. सतत संपर्क साधून हैराण करणार्या अशा १०० शॉर्ट लोन अॅप्सची लोकांनी तक्रार केली आहे. नव्या नियमांतर्गत अशा अॅपना बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. Xiaomi, Realme सारख्या कंपन्यांचा शॉर्ट लोन अॅपमध्ये समावेश आहे.
गुगल ड्राइव्ह आणखी सुरक्षित
गुगलमधील चांगली सेवा देणार्या गुगल ड्राइव्ह अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याची सुरक्षा वाढविण्यासाठी गुगलकडून एक अपडेट आणले जाणार आहे. गुगल १३ सप्टेंबरला नवा सुरक्षा अपडेट जारी करणार आहे. या अपडेटमुळे ड्राइव्ह पूर्वीपेक्षाही अधिक सुरक्षित होणार आहे.
अॅमेझॉनमधून खरेदी महाग?
अॅमेझॉन अॅपमधून वस्तू खरेदी करणे आता महाग होणार आहे. असे होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्याने कंपनीकडून लॉजिस्टिक कॉस्ट म्हणजेच वाहतुकीवरील खर्चात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५०० ग्रॅमच्या पॅकेजसाठी ५८ रुपये द्यावे लागू शकतात.
JioPhone Next ची बुकिंग सुरू
जगातील सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन JioPhone Next ची खरेदी करण्याची इच्छा असेल तर सप्टेंबरमध्ये तुम्ही प्री- बुकिंग करू शकतात. JioPhone Next ची या आठवड्यात बुकिंग सुरू होणार आहे. JioPhone Next ची बेस व्हेरिएंटची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा कमी असेल. दहा टक्के रक्कम देऊन ग्राहक हा फोन बुक करू शकतात. ग्राहक ५०० रुपयांपेक्षा कमी रक्कम देऊन फोन घेऊ शकतात. JioPhone Next हा स्मार्टफोनचे १० सप्टेंबरला अनावरण होणार आहे. त्याची प्री-बुकिंग एक सप्टेंबरपासून सुरू होईल.