मुंबई – जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक आणि विक्रेता हिरो मोटोकॉर्प कंपनीने आणखी एक नवा विक्रम केला आहे, तो म्हणजे या कंपनीने केवळ एका दिवसात १ लाखांहून अधिक दुचाकींची विक्री केली आहे, त्यात बाईकपासून स्कूटरपर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे. हिरो मोटोकॉर्पने म्हटले आहे की, आमच्या कंपनीने दि. ९ ऑगस्ट रोजी देशभरात १ लाखांहून अधिक वाहने विकून नवा विक्रम केला. या दिवशी कंपनीचा १० वा वर्धापनदिन साजरा झाला. हीरो मोटोकॉर्प ही अग्रगण्य दुचाकी उत्पादक म्हणून प्रसिद्ध असून अभिमानाची बाब आहे. या विक्रीमध्ये देशांतर्गत आणि निर्यात या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे आणि याच कारणामुळे कंपनीने सणासुदीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने विकली आहेत.
हीरो मोटोकॉर्प, विक्री आणि विक्रीचे प्रमुख नवीन चौहान यांनी या कामगिरीवर भाष्य करताना म्हटले की, सण-उत्सवाच्या काळात अशी एक दिवसात अशी विक्री अभूतपूर्व आहे. तसेच ९ ऑगस्टला कंपनीला १० वर्षे पूर्ण झाले आहेत. हिरो ब्रँडच्या ग्राहकांनी या दिवशी ‘हिरो डे’ साजरा करून आमचा विश्वास दृढ केला आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक मोबिलिटी लक्षात घेऊन हिरो मोटोकॉर्पने या सेगमेंटमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल यांनी सांगितले की, हीरो इलेक्ट्रिक स्कूटरचे पहिले वाहन लवकरच सादर केली जाईल. सुरुवातीच्या टप्प्यात, कंपनी ही स्कूटर २० वेगवेगळ्या बाजार पेठेत लॉन्च करेल.