नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिलिंडरचे दर १ हजारच्या खाली यायला तयार नाहीत. किराण्याचे सामान महागलेले. खाद्यतेलाचे दर पाहून अक्षरश: नोकरदारांचे तेल निघत असताना १ एप्रिलपासून काही औषधांचे दर देखील वाढणार आहेत. त्यामुळे सामान्यांना आर्थिक झळ बसणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारने अधिसूचित केलेल्या वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकात वार्षिक बदलामुळे २०२२ च्या आधारावर किंमत १२.१२ टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असे औषध किंमत नियामक नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने सांगितले आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर फार्मा कंपन्या औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत आहेत.
पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयाच्या औषधांसह जवळपास ९०० औषधांच्या किंमती १२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकतात. नॉन शेड्यूल औषधांच्या किमतीत परवानगीपेक्षा जास्त वाढ होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. दरम्यान, शेड्यूल औषधे म्हणजे ती औषधे, ज्यांच्या किमती नियंत्रित असतात. तर उर्वरित औषधे नॉन शेड्यूल्ड औषधांच्या कॅटगरीत येतात आणि त्यांच्या किमती १० टक्क्यांपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात. मात्र, नियमानुसार नॉन शेड्यूल औषधांच्या किमती सरकारच्या परवानगीशिवाय वाढवता येत नाहीत.
औषध किंमत नियामक अर्थात नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीला मागील कॅलेंडर वर्षाच्या वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकानुसार दरवर्षी १ एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी अनुसूचित फॉर्म्युलेशनच्या कमाल मर्यादा किंमतीत सुधारणा करण्याची परवानगी आहे. औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ च्या क्लॉज १६ मध्ये या संदर्भात नियम आहे. या आधारावर नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी दरवर्षी औषधांच्या किमतीत सुधारणा करते आणि नवीन किमती १ एप्रिलपासून लागू होतात.
1 April 2023 Essential Drug Prices Hike