अखेर साहित्य संमेलनाची २६, २७ व २८ मार्च ही तारीख निश्चित
नाशिक – येथे होणाऱ्या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या निवडीची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले – पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. हे साहित्य संमेलन २६, २७ व २८ मार्च रोजी येथील कॉलेजरोडवर असलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रागंणात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संमेलन अध्यक्ष पदासाठी भारत ससाणे, जनार्दन वाघमारे, बाळ फोंडके, रामचंद्र देखणे, मनोहर शहाणे यांची नावे होती. पण, त्यात बहुमताने डॉ. नारळीकर यांच्या नावाची निवड करण्यात आली.
साहित्य महामंडळाची दोन दिवस नाशिकमध्ये बैठक सुरु होती. ही बैठक संपल्यानंतर झालेले निर्णय पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या बैठकीत महामंडळाचे पदाधिकारी उपस्थितीत होते. लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले, अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी बैठकीचे संयोजन केले.
अशी होती बैठक
महामंडळाची २३ जानेवारी संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेबाबत चर्चा झाली. त्यानंतर २४ जानेवारी रोजी संमेलनाध्यक्ष निवडीची बैठक झाली. या बैठकीनंतर नावाची घोषणा करण्यात आली. साहित्य महामंडळाच्या विविध १० घटक संस्था, माजी संमेलनाध्यक्ष व निमंत्रक यांच्याकडून आलेल्या नावावर विचार करुन संमेलनाध्यक्षांची निवड करण्यात आली.
—