नाशिक – सातबारा दुरुस्तीसाठी येत्या मंगळवारी (२ फेब्रुवारी) सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत नाशिक तहसिल कार्यालयात महाराजस्व अभियांनांतर्गत विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ च्या अभियानाअंतर्गत हस्तलिखीत व संगणकीकृत सातबारा तयार करतांना, त्यात काही हस्तदोष अथवा त्रुटी असल्यास त्या त्रुटींच्या दुरूस्तीसाठी मोठी संधी यानिमित्ताने मिळणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिकचे तहसिलदार अनिल दौंडे यांनी केले आहे.
शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्यानुसार, महसुल विभागामार्फत सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. याअनुषंगोन सातबारा संगणकीकरण करतांना अनावधाने काही चुका झाल्या असल्यास त्यांच्या दुरूस्तीसाठी या विशेष शिबीरास नाशिक शहर व तालुक्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या मिळकतीच्या सातबाऱ्यामध्ये झालेल्या हस्तदोषांच्या निराकरणासाठी आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह शिबीर कालावधीत उपस्थित राहावे, जेणेकरून सातबाऱ्यातील दोषांचे तात्काळ निकारण करणे शक्य होईल.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिने या विशेष शिबीराचे आयोजन करण्याचे सुचित केले आहे. त्यानुसार नाशिक शहर व तालुक्यातील नागरिकांनी सातबारा दुरूस्तीबाबतच्या आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह सदर शिबीरास उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक तहसिलदार अनिल दौंडे यांनी शासकीस प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.