मनाली (हिमाचल प्रदेश) – माऊंटन मॅन दशरथ मांझी याची कथा चित्रपटामुळे जगभरात पोहोचली. आता लडाखचेच एक माऊंटन मॅन सध्या चर्चेच आहे. या व्यक्तीने हिमालयाच्या भागातील एक मोठा डोंगर पोखरुन ३८ किलोमीटरचा रस्ता तयार केला. त्यांचे नाव लामा त्सुलटिम छोंजोर असे असून ते ७० वर्षांचे आहेत. त्यांना पद्मश्री देखील मिळाला आहे. लामा यांना लद्दाखचा दशरथ मांझी असे म्हटले जाते.
सर्वसाधारण रस्त्याच्या तुलनेत एका डोंगरावर रस्ता तयार करणे अत्यंत अवघड आहे. पण लामाने ही किमया साधली. लामा हे जंस्कार घाटीतील स्तोंग्दे गावातील राहणारे आहेत. जंस्कार घाटीत त्यांना मेमे छोंजोर म्हटले जाते. त्याचा अर्थ दादा छोंजोर असा होतो. ३८ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी केवळ श्रमदानच झाले नाही तर त्यात लामा यांची चल-अचल संपत्तीही खर्च करण्यात आली आहे. त्यांनी तयार केलेल्या रस्त्यावरून ते जेव्हा दुसऱ्या शेजारच्या गावात जीपने पोहोचले तेव्हा गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होता.
हिमालय क्षेत्रातील दशरथ मांझी संबोधले जाणारे लामा यांना पद्मश्री मिळाल्याने गावात आनंदाची लहर आहे. तसेच लाहोल स्पितीमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. दारचा ते शिंकुला दर्रा मार्गे जाणारा हा रस्ता लेह लद्दाखच्या कारगिलस जिल्ह्याच्या जंस्कारमधील पहिले गाव करग्यापर्यंत बनविण्यात आला आहे. अटल टनेल रोहतांगच्या नंतर केंद्र सरकारची प्राथमिकता शिंकुला दर्राच्या खाली सुरंग तयार करण्याची आहे. लामाने डोंगर पोखरुन तयार केलेल्या रस्त्याचा लाभ हिमाचल प्रदेशलाही होणार आहे, हे विशेष. लामाने आपली संपत्ती विकून ५७ लाख रुपयांची मशिनरी खरेदी केली. त्यानंतर त्यांनी कारगिल जिल्ह्याच्या करग्या गावातील हिमाचल प्रदेशपर्यंत रस्ता तयार करण्याचा निर्धार केला.