नाशिक – शहरासह जिह्यातील बेकायदा गावठी पिस्तूल विक्रीचे मध्यप्रदेश कनेक्शनचा ग्रामिण पोलीसांनी पर्दाफास केला असून, या कारवाईत तब्बल अकरा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यात एका अल्पवयीन युवकाचा समावेश असून, त्याच्या ताब्यातून ६ गावठी कट्टे,आठ मॅग्जीनसह ३२ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत. या टोळीतील दोन संशयीत अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
विपुल यमाजी आहिरे (रा.लासलगाव),संतोष ठाकरे (रा.विंचूर),केशव माधव ठोंबरे (रा.पिंपळद ता.चांदवड),सागर वाघ,दिपक पोळ,पंकज चंद्रकांत वानखेडे,विनोद सोपान तांबे,अजीम अल्ताफ शेख,करन जेऊघाले व पवन आनंद नेटारे (रा.लासलगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून सायमन उर्फ पाप्या पॅट्रीक मॅनवेल व शेखर नामक वितरक अद्याप फरार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पोलीस अधिक्षक सचिन पाटील,अप्पर अधिक्षक शर्मिष्ठा घाडगे – वालावलकर तसेच उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामिण पोलीसांनी अवैधरित्या धारदार आणि अग्नीशस्त्र बाळगणा-यांना आपल्या रडारवर घेतले आहे. या पार्श्वभूमिवर लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहूल वाघ यांना मिळालेल्या माहितीवरून या रॅकेटचा पर्दाफास करण्यात पोलीसांना यश आले आहे. लासलगाव येथील गणेश नगर भागात राहणा-या विपूल आहिरे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार त्यास एरिगेशन कॉलनीत बेड्या ठोकल्या असता अंगझडतीत त्याच्याकडे गावठी कट्टा व ५ काडतुसे मिळून आले. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसात तपासात त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने मध्यप्रदेशातील उमर्टी या गावातून शेखर भाई नामक वितरकाकडून पिस्तूल खरेदी करून विक्री केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीसांनी धाडसत्र राबवून उर्वरीत संशयीतांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून सहा गावठी कट्टे, आठ मॅग्जीनसह ३२ जीवंत काडतुसे हस्तगत केले आहेत. या गुन्हयात एका अल्पवयीन मुलास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात अग्नीशस्त्र पुरविणारा एमपीचा वितरक आणि सायमन उर्फ पापा मॅनवेल हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. संशयीतांच्या अटकेने बेकायदा पिस्तूल खरेदी विक्रीचा भांडाफोड होणार असून, या कारवाईने बेकायदा पिस्तूल खरेदी करणा-यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राहूल वाघ,उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे,जमादार जोपळे,हवालदार भागवत पगार,दौलत ठोंबरे,पोलीस नाईक योगेश शिंदे,कैलास महाजन,वाडीलाल जाधव,शिपाई प्रदिप अजगे,गणेश बागुल,शेलार,देशमुख आदींच्या पथकाने केली.