गुवाहाटी – केंद्रीय निवडणूक आयोग आसामसह पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात करण्याची शक्यता आहे. आसामध्ये धेमाजी जिल्ह्यातल्या सिलापथारमध्ये सोमवारी झालेल्या एका सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचे संकेत दिले.
वर्षांनुवर्षे आसामसह ईशान्येकडील राज्यांकडे दुर्लक्ष होत आले आहे. गेल्या वेळी (२०१६ मध्ये) आसाम विधानसभा निवडणुकांची घोषणा चार मार्चला झाली होती. यंदाही मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु हे काम निवडणूक आयोगाचं आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
गॅस, तेल आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित ३,२२२ कोटी रुपयांच्या पाच मोठ्या परियोजनांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. आसाम, बंगाल, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या निवडणुका असलेल्या राज्यात शक्य तितक्या वेळा दौरा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या राज्यात एप्रिल-मेदरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
दिल्ली दूर नव्हे, आपल्या दरवाज्यावर
स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत ज्यांनी देशात राज्य केलं, ते समजत होते की दिसपूर आणि दिल्लीदरम्यान खूप जास्त अंतर आहे. पंरतु दिल्ली आता दूर नाही, आपल्या दरवाज्यावर आहे, असं ते म्हणाले. या क्षेत्रातल्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आसाममधल्या सर्बानंद सोनोवाल सरकारच्या कामांचं त्यांनी कौतुक केलं.