नवी दिल्ली – केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी मोबाईल अॅप्सवर कायमस्वरुपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी गेल्या वर्षी जूनमध्ये चीनी अॅप्सवर तात्पुरती बंदी घातल्यानंतर आता सरकारने हा कठोर निर्णय घेतला असून या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचा जाब विचारला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणाची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ५९ चीनी अॅप्स चालवणाऱ्या कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. चीनशी सीमा विवादानंतर सरकारने गेल्या वर्षी भारतात या अॅप्सचा प्रवेश निलंबित केला होता. सदर चिनी अॅप्स देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि अखंडतेसाठी हानिकारक असलेल्या कार्यात गुंतलेली असल्याची विश्वसनीय माहिती त्यांना मिळाली होती.
केंद्र सरकारच्या या कृतीतून चिडलेल्या चीनने म्हटले होते की, अॅप्सवर बंदी घालण्याचा भारताचा निर्णय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (डब्ल्यूटीओ) च्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चौथ्यांदा भारत सरकारने कडक कारवाई केली होती आणि त्यानंतर आणखी ४३ अॅप्सवर बंदी घातली होती. मे २०२० ते ऑक्टोबर २०२० या दरम्यान भारत सरकारने एकूण २६७ चिनी अॅप्सवर बंदी घातली होती.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी जानेवारीच्या सुरूवातीस चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही चीनला मोठा धक्का दिला. तेव्हा ट्रम्प म्हणाले होते की, चीनमध्ये बनविलेल्या आणि तेथून नियंत्रित केल्या गेलेल्या या अॅप्समुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण झाला असून, त्या दृष्टीने त्वरित कारवाई करण्याची गरज आहे.