नवी दिल्ली – देशात कोरोना महामारीची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. शनिवारी (३ एप्रिल) या वर्षीचेच नव्हे तर गेल्या सहा महिन्यांनतर प्रथमच एका दिवसात ९० हजार रुग्ण आढळले असून ७०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५२ दिवसात सक्रिय रुग्णांमध्ये पाचपट वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि केरळ या राज्यातून रुग्णसंख्या वाढत असताना इतर १२ राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. आता या राज्यात उत्तर प्रदेशचाही समावेश झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, २४ तासात कोरोनाचे ८९,१२९ नवे रुग्ण आढळले असून एकूण ७१४ लोकांचा मृत्यू झालेला आहे. ४४,२०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यापूर्वी २० सप्टेंबर २०२० मध्ये ९२,६०५ संसर्ग झालेले आणि २१ ऑक्टोबरला आताच्या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू झाले होते.
एकूण कोरोनाबाधितांचा आकडा एक कोटी २३ लाख ९२ हजारांहून अधिक झाला आहे. त्यात अतापार्यंत एक कोटी १५ लाख ६९ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर १ लाख ६४ हजार ११० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर घसरून ९३.३६ टक्के आला आहे. मृत्यूदर १.३२ टक्केवर आला आहे.
सलग २४ दिवस संसर्ग वाढला
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, सक्रिय रुग्णांचा आलेख सलग २४ दिवसात वाढला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ६,५८,९०९ झाली आहे. ती एकूण रुग्णसंख्येच्या ५.३२ टक्के आहे. याच वर्षी १२ फेब्रुवारीला सक्रिय रुग्णसंख्या १,३५,९२६ इतकी घसरली होती. ती एकूण संसर्गग्रस्तांच्या १.२५ टक्के होती.
देशात २४.६९ कोटी नमुन्यांची चाचणी
भारतीय चिकित्सा संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या नुसार, कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी देशभरात आतापर्यंत २४.६९ कोटी नमुन्यांची तपासणी झाली आहे. यामध्ये शुक्रवारी १०.४६ लाख नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउनचे संकेत
महाराष्ट्रासह आठ राज्यात ८१.४२ टक्के नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ४७,९१३ रुग्ण आढळले असून, ४८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती सुधरली नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाउन लावण्याचे संकेत दिले आहेत.
आठ राज्यात ८२ टक्के रुग्ण
कर्नाटकमध्ये ४,९९१ आणि छत्तीसगडमध्ये ४,१४७ नवे रुग्ण वाढले आहेत. पंजाबमध्ये ५७, छत्तसगडमध्ये ४३, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी १६ आणि केरळ तसेच दिल्लीत १४-१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या आठ राज्यांशिवाय गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि केरळमध्ये रुग्णांवाढीचा आलेखही चढत आहे.