इस्लामाबाद – मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये भाडेपट्टीच्या रकमेवरून उद्भवलेल्या वादात पाकिस्तानची जबरदस्त नाचक्की झाली आहे. जप्त करण्यात आलेली आपली विमाने सोडोविण्यासाठी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सने आयरिश जेट कंपनीला ७० लाख डॉलर (भारतीय ५१ कोटी रुपये) एवढी रक्कम चुकविली आहे. पाकिस्तान एअरलाईन्सने लंडन उच्च न्यायालयात ही माहिती दिली.
पीआयएने लंडन उच्च न्यायालयाला सांगितले की त्यांनी भाडेपट्टीवर घेतलेल्या दोन विमानांच्या प्रकरणात पेरेग्रीन एव्हीएशन चार्ली कंपनीला ७० लाख अणेरिकन डॉलर रक्कम चुकविली आहे. दोन्ही पक्षांच्या वकिलांनी भविष्यात करारानुसार रक्कम चुकविली जाईल अशा आशयाचे प्रतिज्ञापत्रही न्यायालयात दिले. विमानांच्या भाडेपट्टीची रक्कम न दिल्याच्या प्रकरणात स्थानिक न्यायालयाच्या आदेशांनंतर मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात क्वालालंपूर विमानतळावर पीआयएचे बोईंग-७७७ विमान जप्त केले होते. करारानुसार पीआयएला दरमहा ५ लाख ८० हजार डॉलर चुकवायचे होते. मात्र पाकिस्तानने तसे केले नाही त्यामुळे विमान कंपनीने आक्टोबर २०२० मध्ये खटला चालवला.
पाकिस्तानच्या हालचालींवर पहिलेपासून लक्ष
भाड्याने विमान देणारी कंपनी पाकिस्तानच्या वागणुकीमुळे हैराण होती. त्यामुळे त्यांची पीआयएच्या प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर होती. त्यामुळे मलेशियाच्या विमानतळावर पाकिस्तानचे विमान उतरणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी जप्तीची प्रक्रिया सुरू केली.
जगभरात पाकिस्तानची नाचक्की
पाकिस्तानच्या अशा व्यवहारामुळे कंपनीने लंडन उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशांनुसार पाकिस्तानच्या बोईंग-७७७ विमानाची जप्ती करण्यात आली. मलेशियाला पाकिस्तान आपला मित्र राष्ट्र मानतो. मात्र या प्रकरणात पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली.
कोरोनाचे कारण
पीआयएने पैसे भरू न शकण्यासाठी कोरोनाचे कारण पुढे केले आहे. हवाई वाहतूक ठप्प पडल्यामुळे पाकिस्तान एअरलाईन्सला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला, त्यामुळे पैसे चुकवायला उशीर झाला, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.