नाशिक – बनावट इनव्हाईस विरोधात सुरु असलेल्या अभियानाअंतर्गत नागपूर विभागीय युनिटच्या नाशिक प्रादेशिक युनिट डीजीजीआय म्हणजे जीएसटी गुप्तविभाग महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात अनेक व्यावसायिक इमारती आणि निवासी इमारतीत शोध मोहीम घेतली.
जीएसटी नोंदणी घेतलेली अनेक आस्थापने अस्तित्वात नसल्याचे या तपासात आढळून आले. केवळ बनावट जीएसटी व्यवहारासाठी ही आस्थापने निर्माण केल्याचे लक्षात आले आहे. याचा सूत्रधार जळगावस्थीत असल्याचे तपासादरम्यान पकडण्यात आलेल्या व्यक्तींच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. बनावट आस्थापनांच्या नोंदणीसाठी त्याने काही पॅन क्रमांक आणि बँक तपशील घेऊन त्यांच्या मोबाईल क्रमांक आणि ई मेल आयडीचा वापर त्यासाठी केला. या सूत्रधाराच्या मालकीच्या एका बनावट कंपनी खेरीज त्याने, मुंबई, पुणे आणि जळगाव इथे जीएसटी नोंदणी द्वारे १७ बनावट कंपन्या काढल्याचे त्याच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. कोणत्याही मालाचा किंवा सेवेचा पुरवठा किंवा स्वीकार न करणाऱ्या या १८ बनावट कंपन्यानी ५०० कोटीचे बनावट व्यवहार करत सुमारे ४६.५० कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडीट फसवणुकीने घेतले आहे.