चंदौसी / भोपाळ – काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तीन मुलांची आई असलेल्या विवाहित माहिलेला खुद्द तिच्या काकानेच आपल्याबरोबर बलिया जिल्ह्यात आणले आणि चंदौसी गावात नवाबपुरा येथे एका इसमाला ४० हजार रुपयांना विकले. त्यानंतर त्या माणसाशी तिचे दुसरे लग्नही लावून दिले. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुसऱ्या नवऱ्याने तिला विकत घेण्याचे रहस्य उघड केले, तेव्हा त्या महिलेने संधी मिळताच मुलांसमवेत तेथून पळ काढला. आणि पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी गुन्हा नोंदवत पोलिसांनी तिचा काका, दुसरा नवरा आणि लग्नात मध्यस्थी करणाऱ्या दलालास अटक केली.
याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, मध्य प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील शिवरामपूर नजिक मोहनछपरा या गावी राहणारी २७ वर्षीय महिला आणि तीन मुले यांना नात्याने काका असलेल्या संजय यादव याने कामाला लावण्याच्या बहाण्याने दहा दिवसांपूर्वी आपल्यासोबत घरी आणले.
त्यानंतर चंदौसी परिसरातील मुडियाखेडा गावात या काकांनी त्यांना आपल्या बहिणीच्या घरी ठेवले होते. त्या महिलेला काम मिळून देण्यासाठी तिचे लग्न लावणे आवश्यक असल्याचे सांगून तिचे नवाबपुरा गावच्या नैनसिंहशी बळजबरीने लग्न करून दिले.
नवाबपुरा गावचे वेदपाल आणि संजय यांनी लग्न करण्यात मध्यस्थांची भूमिका बजावली. त्यानंतर तिचा नवरा नैनसिंग त्याने तिच्या नऊ वर्षाच्या मोठ्या मुलाला मारहाण केली, आणि त्या महिलेला तिच्या काकाकडून ४० हजार रुपयांना खरेदी केल्याचे सांगितले.
ही दुर्देवी घटना सत्य असल्याचे समजल्यानंतर ती महिला संधी पाहून मुलांसह रात्री घराबाहेर पडली आणि रस्त्यावरच रात्र घालवून सकाळी पोलीस ठाण्यात पोहोचली. या प्रकरणी काकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.