मुंबई – ‘सरकारने शेतकऱ्यांची थट्टाच लावली आहे. ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना रांग लावून हाल अपेष्टा सहन करून कापसाची विक्री केली. परंतु ३१ मे नंतर विकलेल्या कापसाचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाहीत. कापसाचे पैसे शेतकऱ्यांना केव्हा देणार’ असा सवाल माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.
बोंडे म्हणाले की, यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा अवस्था दयनीय झाली आहे. कापूस उत्पादक संघांनी वाढीव ग्रेडरची मागणी डिसेंबर पासून केली होती पण शासनाने ग्रेडर वाढवून दिले नाही. परिणामी लॉकडाऊनच्या अगोदर अतिशय कमी प्रमणात कापसाची खरेदी झाली लॉकडाऊन नंतर शेतकऱ्यांना कापूस स्वतःच्या घरातच भरून ठेवावा लागला केंद्र सरकारने कापसाच्या खरेदी करिता पर्याप्त निधी उपलब्ध करून दिल्यावर सुद्धा राज्य सरकार परिणामकारक रित्या कापूस खरेदीची यंत्रणा राबवू शकले नाही. शेतकऱ्यांचा कापसाच्या गाड्याच्या रांगाच रांगा खरेदी केंद्रावर दिसून येत होत्या. तीन-तीन दिवस पर्यंत थांबावे लागल्याने शेतकऱ्याला गाडी भाड्याचा भुर्दंड सुद्धा सहन करावा लागला कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना अपमान सुद्धा सहन करावा लागला व भ्रष्टाचाराला तोंड द्यावे. लागले एवढे सर्व दिव्य पार करूनही ३१ मे नंतर विकलेल्या कापसाचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही. ऑगस्ट महिना संपत असून बँका पीककर्ज देत नाही आणि कापसाचे पैसे अद्यापही मिळाले नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. म्हणून शासनाने तातडीने कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी डॉ. बोंडे यांनी केली आहे.