चेन्नई – तामिळनाडूचे एक कंडक्टर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या कंडक्टरनं गेल्या तीस वर्षांत स्वतः पैसे खर्च करून तीन लाख रोपं लावली आहेत. सोशल मीडियावर सगळेच जण त्यांचं कौतुक करत आहेत. मारीमुथू योगनाथन तामिळनाडूमधील राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करतात. योगनाथन यांच्या योगदानाबद्दल त्यांना उपराष्ट्रपती यांच्या हस्ते वॉरियर्स नावाचा पुरस्कार दिला आहे.
याशिवाय योगनाथन यांना चित्रपट निर्माते माईक पांडे आणि अभिनेता जॉन अब्राहम यांच्या हस्ते दिल्लीमध्ये झालेल्या टिंबरलँड कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं आहे. नुकतंच @JainMaggii नामक ट्विटरवरील हँडलनं बस कंडक्टरचा फोटो व्हायरल केला आणि लिहिलं की, मरीमुथू योगनाथन एक बस कंडक्टर, ज्यांनी गेल्या ३० वर्षांपासून स्वतःच्या पैशांनी ३ लाखांहून अधिक झाडं लावले आहेत. वास्तविक पर्यावरणवादी!
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा ट्विटला उत्तर दिलं आणि म्हणाले, माझ्या वाढदिवशी प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. या ट्विटला पाहून युजर्सनी योगीनाथन यांचं कौतुक केलं. योगनाथन यांनी जवळपास ३,७४३ विद्यापीठं, महाविद्यालयं, शाळा आणि औद्योगित क्षेत्रात जाऊन पर्यावरणाबद्दल जनजागृती केली. तामिळनाडू सरकारकडून त्यांना टिल्लू सुत्रू सुजल स्याल वीर या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. केंद्र सरकारनं वॉरियर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.