मुंबई – थकबाकीदारांविरोधीची मोहिम कॅनरा बँकेने तीव्र केली आहे. म्हणूनच शुक्रवारी (२६ मार्च) २ हजार थकबाकीदारांच्या मालमत्तेचा ई–लिलाव बँकेकडून केला जाणार आहे. बँकेचे कर्ज चुकविण्यात अपयशी ठरलेल्या कर्जदारांचा यामध्ये समावेश आहे. कायद्यानुसार लिलावाच्या प्रक्रियेची माहिती देत बँकेने इच्छूक व्यक्ती ई–लिलावात कोणत्याही भागातून सहभागी होऊ शकतात असे सांगितले आहे.
लिलावात बोलीच्या प्रक्रियेत रहिवासी फ्लॅट, अपार्टमेंट, घर, औद्योगिक जमीन, व्यवसायिक कॉम्प्लेक्स, कार्यालय, रिकामा भूखंड आदींचा समावेश आहे. ही मालमत्ता दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू व चेन्नईसह अनेक शहरांमधील आहे.
कायद्यानुसार कर्ज चुकविले नाही तर बँकांना तारण असलेली मालमत्ता आपल्या ताब्यात घेण्याची तरतूद आहे. या कायद्यांतर्गत मालमत्ता विकून आपले कर्ज चुकवून घेण्याचा अधिकारही बँकांना आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत कर्ज चुकविण्यासाठी १ हजार ५४० कर्जदारांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला आहे. या माध्यमातून एकूण ८८६ कोटी रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे थकबाकीदारांना अद्दल घडविण्यासाठी कॅनरा बँक चांगलीच आक्रमक झाल्याचे स्पष्ट होत आहे.