मुंबई – भारत आणि इंग्लंड संघात अहमदाबाद येथे झालेला कसोटी सामना आता इतिहासात नोंदविला गेला आहे. भारतीय क्रिकेट संघाने अवघ्या दोनच दिवसांत इंग्लंडला पराभूत केले आहे. 5 दिवसांचा कसोटी सामना केवळ दोनच दिवसांत संपलेला आहे, अश्या घटना इतिहासात फार कमी वेळा बघायला मिळाल्या आहेत. भारताने यापूर्वी अफगाणिस्तानच्या विरोधात 2018 मध्ये असाच विजय प्राप्त केला होता.
भारताने अहमदाबादमध्ये अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांच्या दमदार गोलंदाजीच्या आधारावर इंग्लंडच्या टीमची ऐशीतैशी केली. पहिल्या डावात अक्षर पटेलने 6 आणि अश्विनने 3 विकेट्स घेतल्या.
त्यामुळे इंग्लंडचा संघ 112 धावा काढून माघारी परतला. दुसऱ्या डावार अक्षरने 5 तर अश्विनने 4 विकेट्स घेऊन इंग्लंडच्या संघाला दोन अंकी धावसंख्येवरच म्हणजे 81 धावांवरच पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यामुळे भारतापुढे केवळ 49 धावांचेच लक्ष्य होते.
दोन दिवसांत संपलेले कसोटी सामने
अहमदाबादमधील कसोटी सामना इतिहासातील 22 वा असा सामना आहे जो केवळ दोनच दिवसात संपला. गेल्यावेळी भारताने जून 2018 मध्ये अफगाणीस्तानविरुद्ध बंगळुरू येथे दोन दिवसांत कसोटी सामना जिंकला होता.
सर्वांत पहिले 1882 मध्ये इंग्लंडने आस्ट्रेलियाविरुद्ध दोन दिवसांत कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर 1988 मध्ये इंग्लंडने आस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली होती. 1889 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंडला दोन्ही कसोटी सामन्यात दोन दिवसांच्या आतच पराभूत केले होते.
त्यानंतर 1980 मध्ये इंग्लंडने ओव्हलच्या खेळपट्टीवर आस्ट्रेलियाला अशीच मात दिली होती. 1896 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणाऱ्या इंग्लंड टीमला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये दोन दिवसांत असाच पराभव पत्करावा लागला.
1912 मध्ये 2 वेळा सामना दोन दिवसांत संपला होता. 1921 ते 2020 या कालावधीत 10 कसोटी सामन्यांचा निकाल दोन दिवसांमध्ये लागला.