अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : राज्यातील ५२ हजार ४३७ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे १ जुलै ते २१ जुलैपर्यंत राज्यातील १ कोटी १८ लाख ९८ हजार ९१३ शिधापत्रिका धारकांना २७ लाख ८१ हजार ४९७ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४३७ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे १४ लाख ९४ हजार २५५ क्विंटल गहू, ११ लाख ४७ हजार २९२ क्विंटल तांदूळ, तर १५ हजार ६९९ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे २ लाख ६६ हजार ३१९ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.