दिंडोरी : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ग्रामपंचायत निवडणूकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याचे पोहोच पावती जोडणे शासनाने बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयास मोठ्या प्रमाणात निवडणूकीत उभे राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज दाखल होतील. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर या शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक हे कार्यालय ग्रामपंचायत निवडणूकीचे अर्ज स्विकृतीसाठी सकाळी १० ते ५ यावेळेत चालू असणार आहे असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांचेकडून करण्यात आले आहे. उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा जात पडताळणी समितीच्या वतीने सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जात पडताळणी समितीचे उपायुक्त माधव वाघ यांनी दिली आहे.