नाशिक – कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेच असल्याने ‘शाळा बंद मात्र शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हयात शिक्षण विभाग आणि शिक्षकांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण सुरु आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्हयात केबल असलेल्या ठिकाणी केबल नेटवर्कच्या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येणार असून २३ ऑक्टोंबरपासून डेन केबल नेटवर्कवरुन याचे प्रसारण करण्यात येणार आहे.
माहे जून २०२० पासून शैक्षणिक वर्ष सुरू झालेले आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे अद्याप एकही शाळा सुरु करण्यात आलेली नाही. मात्र विविध ठिकाणी व्हॉटसअप, झुम मिटींग, गुगल मीट, रेडिओ आदि माध्यमातून शिक्षकांकडून अध्यापनाचे काम करण्यात येत आहे. जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून केबल नेटवर्कचा वापर करुन शिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २३ ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत डेन केबल नेटवर्कच्या ७९७ क्रमांकाच्या चॅनेलवरुन पहिली ते दहावी पर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येणार आहे.
यामध्ये इयत्ता पहिली सकाळी ८ ते ८.३०, इयत्ता दुसरी ८.३० ते ९, इयत्ता तीसरी ९.०१ ते १० इयत्ता चौथी १०.०१ ते ११, इयत्ता पाचवी ११.०१ ते १२, इयत्ता सहावी १२.०१ ते १, इयत्ता सातवी १.०१ ते २, इयत्ता आठवी २.०१ ते ३, इयत्ता नववी ३.०१ ते ४ व इयत्ता दहावी ५.०१ ते ७ याप्रमाणे रविवार तसेच शासकिय सुटटी सोडून शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम शहर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यत पोहचविण्यासाठी सर्व सबंधितांना निर्देश देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली.