नवी दिल्ली – डिजिटलायझेशनकडे वाटचाल करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे गती घेणे भाग पडले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बहुतांश बँकांनी ऑनलाईन व्यवहारावर भर दिला आहे. २०२३ पर्यंत डिजिटल पेमेंट २० लाख कोटींपर्यंत उच्चांक गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
असेंजर संस्थेच्या अहवालानुसार, पुढील ३ वर्षात डिजिटल पेमेंटमध्ये ६६.६ अब्ज व्यवहारांमध्ये वाढ होईल. तसेच २७० अब्ज डॉलर (१९.९८ लाख कोटी रुपये) एवढे रोख व्यवहार डिजिटलकडे वळतील. २०३० पर्यंत ८५६ अरब डॉलर (६४.०८ लाख कोटी) रुपयांची वाढ होणार आहे. कोरोनामुळे ऑनलाईन बँकिंग वाढत आहे.
भारतात नाही तर जगातच
कोरोनामुळे सर्व बँकांनी डिजिटल पेमेंटची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर ऑनलाईन पेमेंटमध्ये वाढ होत असून २०२३ पर्यंत उच्चांक गाठला जाईल. त्यानुसार ५१.८ लाख कोटींचे रोख व्यवहार डिजीटलमध्ये रुपांतरीत होणार आहेत. या सर्वेक्षणात ऑस्ट्रेलिया, ब्राजील, कॅनडा, चीन, नॉर्वे, सिंगापूर, थाईलैंड, भारत, ब्रिटेन व अमेरिका आदी देशांचा अभ्यास करण्यात आला आहे.