नवी दिल्ली – कोरोनाच्या महामारीमुळे २०२० हे वर्ष केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात कायमचे नोंदले जाणार आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला राम मंदिराच्या भूमीपूजनाचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला तरीही त्यावर कोरोनाच्या भीतीचे सावट होते. कोरोनामुळे लॉकडाऊन दरम्यान, शेकडो किलोमीटर पायी चालत आपल्या मुळगावी परतणाऱ्या कामगार आणि मजूरांच्या वेदना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत परंतु त्या सर्वांच्याच कायम स्मरणात राहतील.
वास्तविक, वर्ष 2020 आता संपत आले आहे. आता हे वर्ष पुढील शतकात किंवा खूप मोठ्या कालखंडानंतर 2O2O फक्त एक संख्या राहील, परंतु यातीत गेल्या 365 दिवसांमधील घटना क्वचितच विसरल्या जातील. ॉ
या वर्षातील म्हणजे 2020 च्या दरम्यानच्या 21 महत्वाच्या घटना-घडामोडींचा आढावा घेऊ या..
सीएए आणि एनआरसीविरूद्ध तीव्र आंदोलन
सन 2020 ची सुरुवात सीएए आणि एनआरसीच्या विरोधाने झाली, परंतु फेब्रुवारीपर्यंत आंदोलन इतके वाढले की, आंदोलकांनी जणू दिल्लीवर कब्जा केला. वास्तविक, दि. 23 ते 29 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीच्या पूर्वोत्तर भागात दंगल सुरूच होती. या कालावधीत, 53 लोकांचे प्राण गमावले, तर शेकडो जखमी झाले. तर कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शेकडो महिला सीएए आणि एनआरसीविरूद्ध शाहीन बागेत महिनाभर रस्त्यावर बसल्या.
कोरोनाचा भारतातही कहर
कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण असताना या विषाणूने भारतातही कहर सुरू केला. ३० जानेवारी २०२० मध्ये देशात कोरोनाची एक ते दोन प्रकरणे नोंदली गेली असली तरी १७ मार्च रोजी कर्नाटकात प्रथम मृत्यूची नोंद झाली. यानंतर संपूर्ण भारत देश कोरोनाच्या विळख्यात अडकला होता. आतापर्यंत देशातील एक कोटीहून अधिक लोक या भयानक विषाणूंमुळे बाधित झालेले आढळले आहेत. त्याच वेळी सुमारे दीड लाख लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.
येस बँक बुडाली
येस बँकेत खाते असलेल्या लोकांना मोठा धक्का बसला, कारण देशातील एक मोठी खासगी बँक कोसळली आणि त्यात कोट्यावधी लोकांचे पैसे अडकले. मार्च 2020 च्या सुरुवातीच्या आठवड्यात आरबीआयने येस बँकेवर निर्बंध लादले. याअंतर्गत ग्राहकांना त्यांच्याच खात्यातून एका महिन्यात 50 हजार रुपयांहून अधिक रक्कम काढता आली नाही. किंबहुना पीएमसी बँकेवरही असे निर्बंध लादले गेले होते, परंतु यात प्रभावित लोकांची संख्या येस बँकेपेक्षा थोडी कमी होती.
देशभरात प्रथमच संपूर्ण लॉकडाउन
आपल्या देशाला कोरोनाच्या तावडीतून वाचवण्यासाठी 25 मार्चपासून 21 दिवसांचा प्रथमच संपूर्ण लॉकडाउन जाहीर झाला. या काळात, रेल्वे, बस आणि विमानांसह
सर्वसामान्य दैनंदिन व्यवहार बंद करण्यात आले. परंतु या काळात, देशाने मजूर व कामगार स्थलांतराचे वेदनादायक दृश्य पाहिले होते, यापुर्वी केवळ 1947 मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात पाहिले गेले होते.
१६ मजुरांच्या अंगावरून मालगाडी गेली
कोरोनाच्या भीतीने दिल्ली-मुंबईसह मोठया शहरात राहणारे हजारो लोक कोणतेही वाहन साधना शिवाय पायीच त्यांच्या मुळगावी घरी जाऊ लागले. त्या काळात सरकारने त्या लोकांना कामाची खात्री पटवून देत अन्न व निवासाची व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला .परंतु काही लोकांनी त्यांच्याकडून कोणतीही मदत घेतली नाही. त्यातच दि.८ मे रोजी औरंगाबाद येथून गावाकडे पायी परत जाणाऱ्या व वाटेतच रेल्वे रुळावर झोपी गेलेल्या १६ मजुरांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने त्याच जागीच मृत्यू झाला.
चार दोषींना तिहार तुरूंगात फाशी
दि. 20 मार्च 2020 ही देशाच्या इतिहासातील एक न्यायाची तारीख म्हणून नेहमीच लक्षात ठेवली जाईल. वास्तविक, त्याच दिवशी दिल्लीत निर्भयावर अमानुष अत्याचार करणारे आरोपी पवन, मुकेश, अक्षय आणि विनय या चार दोषींना तिहार तुरूंगात फाशी देण्यात आले . कारण त्यांनी सुमारे सात वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2012 च्या रात्री भयानक कृत्य केले होते, त्याची ही शिक्षा होती.
शिवराज सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्री
सन २०२० या काळात राजकारणाच्या अनेक घटना घडल्या. यामध्ये मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पडझड आणि शिवराज सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचाही समावेश आहे. कारण काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधियाच्या 22 समर्थकांनी राजीनामा दिला, त्यानंतर कॉंग्रेसचे सरकार अल्पमतात गेले आणि कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणि शिवराज सिंह यांनी 23 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अम्फान वादळाचा तडाका
बंगालच्या उपसागरात आलेल्या अम्फान वादळाने देशाला हादरविले. या काळात देशाच्या पूर्व भागात, पश्चिम बंगालमध्ये प्रचंड नुकसान झाले. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादळाचे वर्णन कोरोना महामारीपेक्षा धोकादायक म्हणून केले होते. अम्फान वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये सुमारे 30 हजार घरे कोसळली, तर 88 हजार हेक्टरमधील पिके नष्ट झाली.
टोळधाडीने पिके नष्ट
देशाच्या पूर्वेकडील भागात, अम्फानच्या वादळाचा कहर ओसरत नाही तोच पश्चिमेकडे पाकिस्तानकडून आलेल्या टोळधाडीने ( मोठे किटक ) उत्तरेकडील भागातील पिकांवर हल्ला केला. या टोळधाडीने राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यात शेकडो एकर पिके नष्ट केली.
भारत – चीन सिमेवर हिंसक संघर्ष
लडाख सीमेवर 16 जूनला रात्री दरम्यान भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झुंज झाली, त्यात 20 भारतीय सैनिक ठार झाले. तसेच सुमारे 40 चिनी सैनिक ठार झाले, परंतु चीनने याची खातरजमा केली नाही. अशा परिस्थितीत भारताने चीनवर कडक निर्बंध लादले आणि सुमारे शेकडो चीनी वस्तूवर बंदी घातली. त्यामुळे चीनला आतापर्यंत कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला सदस्यत्व
कोरोना, अम्फान वादळ आणि चीनशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरही जून २०२० मध्ये भारताला एक चांगली घटना समोर आली, ती म्हणजे भारताला आठव्या वेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचे तात्पुरते सदस्य म्हणून निवडले गेले. यासाठी 192 मतांपैकी 184 मते भारताच्या बाजूने पडली होती.
बॉलीवूडसाठी अत्यंत वाईट वर्ष
2020 हे वर्ष बॉलीवूडसाठी अत्यंत वाईट असल्याचे सिद्ध झाले. कारण या दरम्यान ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी जगाचा कायमचा निरोप घेतला, पण यात सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू हा देशभर चर्चेचा विषय राहिला. कारण, सुशांतचा मृत्यू की आत्महत्या अशा भोवती चर्चा फिरत राहील्या. तसेच बॉलिवूडमध्ये ड्रग्जची तस्करीदेखील समोर आली होती.
राफेल भारतात दाखल
चीनशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरही पाकिस्तानने देखील भारताला डोळे दाखवायला सुरवात केली. त्याच वेळी 27 जुलै रोजी फ्रान्समधील रफाले येथून पाच लढाऊ विमान भारतात आले, ज्यामुळे भारतीय हवाई दलाची संख्या बरीच वाढली. या सेनेला 10 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आले. यानंतर नोव्हेंबरमध्ये आणखी तीन राफेल भारतात आले, त्यामुळे त्यांची एकूण संख्या आठवर गेली.
कुख्यात गुंड विकास दुबे प्रकरण
कानपूरमधील बिकारू गाव ३ जुलै रोजी अचानक चर्चेत आले. कारण येथे कुख्यात गुंड विकास दुबे यांनी आपल्या साथीदारांसह पोलिस पथकावर हल्ला केला आणि त्यात एका अधिकाऱ्यासह आठ पोलिस ठार झाले. या प्रकरणात विकासला मध्य प्रदेशातील उज्जैन येथून पकडले गेले होते आणि कानपूरजवळ पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना एका कथित चकमकीत त्याला गोळ्या घालण्यात आले. या दरम्यान पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत विकास दुबेची संपूर्ण टोळी नष्ट केली.
राम मंदिराची पायाभरणी
सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2019 मध्ये अयोध्याच्या राम मंदिरातील बाबरी मशीद वाद संपुष्टात आणला, त्यानंतर 2020 च्या दि. ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराची पायाभरणी झाली, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथे राम मंदिराचे भूमीपूजन केले.
बिहार विधानसभा निवडणुका
बिहार विधानसभा निवडणुका यंदा विशेष गाजल्या होत्या. कारण कोरोना काळाचा सामना करणार्या देशातील ही पहिली मतदान प्रक्रिया होती, ही निवडणूक आयोगाने यशस्वीरित्या हाताळली. यावेळी बिहारमध्ये आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला, परंतु भाजपच्या मदतीने जेडीयूने सलग चौथ्यांदा सरकार स्थापन केले.
आयपीएलचे सामने
संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देताना बीसीसीआयने आपल्या प्रतिष्ठित लीग आयपीएलचा 13 वे सत्र आयोजित करण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट सामने दुबईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू झाले आणि अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला. या सत्रात मुंबई इंडियन संघ विजेता ठरला. या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात पाचवे आयपीएल विजेतेपद जिंकले. यावेळी कोरोनामुळे भारतीयांनी घरीच टीव्हीवर आयपीएल पाहिल्यामुळे प्रेक्षकांची संख्या 23 टक्क्यांनी वाढली.
भारताचा जीडीपी घसरला
कोरोना विषाणूचा संपूर्ण जगावर भयानक परिणाम झाला. यावेळी भारतासह अनेक देशांच्या अर्थकारणावर वितरित परिणाम झाला. एप्रिल ते जून या तिमाहीत कोरोना बाधित भारताचा जीडीपी 23.9 टक्क्यांनी घसरला. 1996 च्या जीडीपीच्या आकड्यांपेक्षा ही परिस्थिती वाईट आहे.
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन
या वर्षाच्या सुरुवातीला सीएए-एनआरसीविरोधात निषेधाचा सामना करणारी दिल्ली आता या वर्षाच्या गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या रोषाचा बळी ठरली आहे. शेती सुधारण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने तीन नवीन कृषी कायदे तयार केले आहेत, असे सांगण्यात येते, पण शेतकरी त्याला विरोध करीत आहेत. अशा परिस्थितीत पंजाबसह अनेक राज्यांतील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनासाठी बसले आहेत आणि कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करीत आहेत.
शेअर बाजाराने नवीन उंची गाठली
कोरोना संकटाच्या वेळी अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला होता, परंतु भारतीय शेअर बाजाराने नवीन उंची गाठली. यावेळी सेन्सेक्सने 46 हजार 890 च्या सर्वोच्च पातळी गाठली. त्याचबरोबर निफ्टीनेही 13 हजार 740 गुण मिळवले. कोरोना काळात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्येही मोठी वाढ नोंदली गेली. यावर्षी सोन्याने प्रति 10 ग्रॅम 56 हजार 191 रुपयांचा आकडा गाठला, तर चांदीची सर्वाधिक किंमत 77 हजार 949 रुपये प्रति किलो झाली.
गुरु आणि शनि मधील दुर्मिळ घटना
सन २०२० मध्ये एका आश्चर्यकारक खगोलशास्त्रीय घटनेचे संपूर्ण जग साक्षीदार झाले. दि. 21 डिसेंबर रोजी गुरु आणि शनी या ग्रहांमधील कोणीय अंतर फक्त 0.06 डिग्री होते, ज्यामुळे हे दोन ग्रह एकमेकांशी जवळ आलेले दिसले. हे दृश्य 400 वर्षांतून एकदा दिसते. यापूर्वी 1623 मध्ये ही खगोलीय घटना पाहीली गेली. वर्ष 2080 मध्ये गुरु आणि शनि यांच्यातील पुढील दुर्मिळ घटन दिसून येईल.