नवी दिल्ली – अनेक महिन्यांनंतर पुन्हा एकदा आजपासून (१ मार्च) नवे बदल लागू झाले आहेत. या बदलांना लागू केल्यानंतर सामान्य जनजीवन पूर्णपणे बदलू शकते. कोरोना लसीकरणासह अनेक राज्यांमध्ये शाळा उघडणे आणि बँकिंग क्षेत्राशी निगडित अनेक बदलांचा यामध्ये समावेश आहे. या बदलांमुळे आपल्या जीवनात काय बदल होतील हे जाणून घेऊया…
ज्येष्ठांसाठी कोरोना लसीकरण
एक मार्चपासून सुरू होणार्या तिसर्या टप्प्यातील कोरोना लसीकरणामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी ग्रस्त ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही लस देण्यात येणार आहे.
नव्या आयएफएससी कोडची अंमलबजावणी
विजया बँक आणि देना बँकांचे जुने आयएफएससी कोड उपयोगात येणार नाहीत. बँकेच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना नव्या आयएफएससी कोडचा उपयोग करावा लागणार आहे. २०१९ मध्ये विजया बँक आणि देना बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले. यानंतर दोन्ही बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदाचे ग्राहक झाले आहेत. बँक ऑफ बडोदाची नवी एमआयसीआर कोड असलेले चेकबुक ३१ मार्च २०२१ पर्यंत मिळवू शकरणार आहे.
प्राप्तीकरासंदर्भातील योजनेला मुदतवाढ
प्राप्तीकर विभागाकडून प्रत्यक्ष कर वादावर तोडगा काढण्यासाठी आणलेल्या वाद ते विश्वास या योजनेंतर्गत विवरण देण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. तसंच अतिरिक्त कर भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधी वाद ते विश्वास या योजनेअंतर्गत घोषणा करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी होती. तर वादग्रस्त कराचा भरणा करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती.
तीन राज्यात प्राथमिक शाळा उघडणार
एक मार्चपासून देशातील तीन राज्यात प्राथमिक शाळा पूर्णपणे उघडण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारनं पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. हरियाणामध्ये तिसरी ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत.