मुंबई – येत्या १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ ते ६० वयोगटातील गंभीर आजार असलेल्या नागरिकांसाठी कोरोना लस दिली जाणार आहे. त्यासाठी सरकारी आणि खासगी हॉस्पिटलचा पर्याय असणार आहे. ते स्वतः कोव्हीन प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करून लस लावण्याचा दिवस आणि स्थान निवडू शकतात. यापूर्वी नोंदणी न झालेले ज्येष्ठ नागरिक जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करू शकतात. याशिवाय आशा कार्यकर्ता व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवरही आपापल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करून त्यांना लसीकरण केंद्रावर आणण्याची जबाबदारी असेल.
आरोग्य मंत्रालयाकडून शंकेचे समाधान
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांच्या आरोग्य सचिव व नॅशनल हेल्थ मिशनच्या प्रमुखांना 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांच्या शंकांचे समाधानही केले. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी लसीकरण केंद्र हे प्राथमिक आरोग्य केंद्र, सहयोगी आरोग्य केंद्र, आयुष्यमान भारतच्या अंतर्गत येणारी सर्व केंद्र, उपविभागीय व जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज आदी ठिकाणी सुरू करता येणार आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
राज्यांना हे देखील सांगण्यात आले आहे की वयाचा दाखला देण्यासाठी लाभार्थिंना कोणकोणती कागदपत्रे सोबत आणावी लागतील. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्मतारखेचा दाखलाही लसीकरणाच्या वेळी लागणार आहे.
गंभीर आजार असलेल्यांसाठी अट
एखादा गंभीर आजार असलेल्या 45 ते 60 वर्ष वयोगटातील लाभार्थ्याला डॉक्टरचे प्रमाणपत्र सोबत आणावे लागेल. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, पहिले राहून गेलेले आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी देखील या कालावधीत लस घेऊ शकणार आहेत.
ओळखपत्र आवश्यक
आरोग्य क्षेत्रातील ज्या कर्मचाऱ्यांना आता लस घ्यायची आहे त्यांनी आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. पहिली लस घेताना तात्पूरते प्रमाणपत्र आणि दुसरी लस घेताना कायमस्वरुपी प्रमाणपत्र मिळणार आहे. लाभार्थ्याच्या मोबाईलवरही या प्रमाणपत्राचे लिंक पाठविण्यात येईल. त्यावरूनही ते डाऊनलोड करता येणार आहे.