नवी दिल्ली – आपण पाण्याची बाटली खरेदी करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, येत्या १ एप्रिलपासून या बाटलीसाठी नवा नियम करण्यात आला आहे आणि तो तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
बाटलीबंद पाणी आणि जमिनीतील पाणी उत्पादक व विक्रेत्यांना परवाने मिळविण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) ने भारतीय मानक ब्युरोचे (बीआयएस) प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात ही सूचना देण्यात आली आहे. हा आदेश १ एप्रिल पासून अंमलात येणार आहे.
एफएसएसएएआयने म्हटले आहे की, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००८ अन्वये सर्व खाद्य व्यवसाय संचालकांकडे (एफबीओ) कोणताही खाद्य व्यवसाय सुरू करण्यापूर्वी परवाना किंवा नोंदणी करणे बंधनकारक असेल.
अन्न सुरक्षा आणि मानके यांच्या विक्रीवरील निर्बंध कायद्या नुसार बीआयएस प्रमाणन चिन्हा नुसारच कोणीही बाटलीबंद पिण्याचे पाणी किंवा खनिज पाणी विकू शकते. पॅकेज केलेले पिण्याचे पाणी आणि खनिज पाणी तयार करणाऱ्या अनेक उत्पादक कंपन्या आहेत.
एफएसएसएएआय या परवान्यावर काम करत आहे. परंतु त्यांच्याकडे बीआयएसचे पडताळणी चिन्ह नाही. हे लक्षात घेता बीआयएसकडे प्रमाणपत्र परवानासाठी अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे.