नवी दिल्ली – एकीकडे इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचे खिसे रिकामे होत असताना आता राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणं सुद्धा महाग होणार आहे. कारण एक एप्रिलपासून टोलच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे लोकांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणनं (एनएचएआय) टोलच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच मासिक पासच्या दरातही वाढ केली जाणार आहे. एनएचएआय दरवर्षी टोलच्या दरात वाढ करते. याचा परिणाम मालवाहतूक, खासगी वाहनचालक आणि भाड्यानं वाहन घेणार्यांवरसुद्धा होणार आहे. भाड्याने कार केली तरी त्या मार्गावरील टोल ग्राहकालाच भरायचा असतो त्यामुळे त्याचा फटका वाहन नसणार्यांनाही बसणार आहे.
अनेक ठिकाणी बोगस पावत्यांद्वारे वाहनधारकाची फसवणूक होत आहे. आता फास्टॅगसाठीचा टोल वाढल्यावर दुप्पट टोलमध्येही वाढ होणार आहे. फास्टॅगचा उपयोग १६ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आला होता.
एनएचएआयनुसार, देशात दिवसाला १०४ कोटींचा टोल गोळा होत आहे. फास्टॅगमुळे वाहनांच्या रांगा कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु टोल नाक्यांवर प्रत्यक्ष स्कॅनिंगच्या समस्येमुळे हे कादगावरच असल्याचे स्पष्ट होत आहे.