धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील सतत १९२ वर्षांची ऐतिहासिक अखंड परंपरा असलेला संत खंडोजी महाराज यात्रोत्सव यंदा कोरोनामुळे खंडित झाला आहे. पिंपळनेरसह परिसरातील असंख्य गावे या यात्रोत्सवाची आतूरतेने वाट पाहतात. पुण्या-मुंबईसह अनेक ठिकाणी वास्तव्यास असलेले अनेकजण या यात्रेसाठी घरी येतात. डोळ्याचे पारणे फेडणारा हा उत्सव यंदा झाकोळला आहे. याचनिमित्ताने या यात्रोत्सवाची माहिती सांगणारा हा लेख….
धुळे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील पिंपळनेर येथील तब्बल १९२ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला संत खंडोजी महाराज यात्रोत्सव. संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे इतिहासात पहिल्यांदाच ही ऐतिहासिक परंपरा खंडित झाली आहे. या यात्रोत्सवास जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातल्या अनेक भागातुन नागरिक या यात्रेचा आनंद घेण्यास येत असतात. परिसरातील बाहेरगावी असलेले युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यात्रेला आवर्जून आपली उपस्थिति लावतात. या यात्रेचे प्रमुख आकर्षण पायदळी सोंग, जिवंत देखाव्यावर आधारित वहन, कुस्त्या, आदिवासी नृत्य, पाळणे आदी प्रकारचे असते. यामुळेच या यात्रोत्सवाला अनोखी शोभा येते.
(पहा पायदळी सोंगांचा हा व्हिडिओ)
श्रावण महिन्यात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे अखंड हरिनाम सप्ताहाची स्थापना होते. पहाटे ५ वाजता काकडा आरती, सकाळी भजन, दिंडी, समाधी दर्शन, पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन असा दैनंदिन उपक्रम सप्ताहादरम्यान असतो. या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने संपूर्ण शहरात झोळी फिरवली जाते आणि भिक्षा मागितली जाते. नागरिक आपल्या परीने महाप्रसादास लागणारे धान्य, गहू, तांदूळ तसेच झोळीत दक्षिणा देखिल देतात. सप्ताहाच्या समाप्तीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
पहिल्या दिवशी श्री क्षेत्र विट्ठल मंदिर संस्थानच्यावतीने आणि दुसऱ्या दिवशी लाडशाखीय वाणी समाजाच्या वतीने महाप्रसदाचे वाटप करण्यात येते. या साप्ताहात स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात येते. सप्ताहाच्या निमित्ताने पिंपळनेर शहरात यात्रा भरत असते. यात्रेचा कालावधी हा ३ दिवस असतो. पहिला दिवस हा कत्तलची रात्र म्हणून साजरा करतात.
दूसरा दिवस हा कुस्त्यांची भव्य दंगल असते. तिसऱ्या दिवशी आदिवासी नृत्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येते.
पायदळी सोंग
श्रावण महिन्यात गणेश चतूर्थी पासून शहरात पायदळी सोंग निघत असतात. पिंपळनेर शहरातील विविध मंडळांच्या वतीने पायदळी सोंगांचे आयोजन करण्यात येते. शहरातील नाना चौकातील कलियुग सांस्कृतिक कला मित्र मंडळ हे मंडळ पुर्वीपासून अव्वल स्थानावर कायम असून ही परंपरा समाजाच्या नवयुवकांकडून अबाधितपणे सुरु आहे. यात प्रामुख्याने सर्व देवी देवतांचे मुखवटे साज घालून डप या वाद्याच्या तालावर नाचवले जातात. या सोंगांची रेलचेल बघण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात. गणपती, सरस्वती, चंद्र-सूर्य, नरसिंह, खंडेराव, विठ्ठल-रुखमाई, इंद्रजित, कालिकादेवी, सप्तश्रृंगी, मासा अशा अनेक देवतांचे मुखवटे साज घालून संपूर्ण शहरात मिरवले जातात. नंतर विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी नेले जातात.
शहरातील गणेश मंडळांच्यावतीने प्रत्येक सोंग हे विठ्ठल मंदिरात नेले जाते.
ट्रॅक्टरवरील वहन
अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवस म्हणजे कत्तलची रात्र यादिवशी सायंकाळपासून पायदळी सोंगांची रेलचेल पाहण्यास मिळते आणि रात्री ट्रॅक्टरवर सांस्कृतिक मंडळांच्या वतीने वहन काढले जाते. यात देखाव्यासह देवीदेवतांचे साज परिधान करून सजीव देखावा ठिकठिकाणी साजरा केला जातो. या देखाव्यासाठी रोख पारितोषिक व ढाल असे बक्षिस आयोजित केलेले असते. या दिवसापासून यात्रेला प्रामुख्याने सुरुवात होते. यात्रेचा आनंद घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून नागरिक येत असतात. परदेशातील काही पिंपळनेरवासिय सुद्धा यात्रेसाठी येतात.
पालखी सोहळा
कत्तलच्या रात्री १० वाजता विठ्ठल मंदिरातून पालखी निघत असते. पालखीचे स्वागत शहराच्या मध्यभागी असलेल्या जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांतर्फे करण्यात येते. या स्वागतावेळी जातीय सलोखा व सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडून येते. संपूर्ण शहरात पालखी मिरवली जाते. जागोजागी अंगणात सडा, रांगोळ्या, फटाक्यांच्या आतषबाजीने पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात येते. महिला ठिकठिकाणी संत खंडोजी महाराजांच्या पादुकांचे पूजन करतात
कुस्त्यांची भव्य दंगल
विठ्ठल मंदिर संस्थान व शांतता कमिटी पिंपळनेर यांच्यावतीने यादिवशी कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात येते.
या दंगलीसाठी राज्यातल्या कान्या कोपऱ्यातीलच नव्हे तर परराज्यातील पैलवान व मल्लही दाखल होतात. विजेत्या मल्लांना भांडी, रोख रक्कम दिले जाते. परिसरातील नागरिक रोख रकमेच्या कुस्त्या लावतात. खासकरून या दंगलीला आदिवासी समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात.
आदिवासी नृत्य
यात्रेचा शेवटचा दिवस म्हणजे आदिवासी नृत्य स्पर्धा. या स्पर्धेत भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, आदिवासी संस्कृती यावर आधारीत नृत्य साजरी केले जातात. आदिवासी समाजाचे दैवत मानल्या जाणाऱ्या डोंगऱ्यादेव या उत्सवाचे देखिल सादरीकरण केले जाते. या स्पर्धेसाठी नंदुरबार, नवापूर, पेठ, सुरगाणा, अहवा, डांग, दवळीदौंड (गुजरात) अशा अनेक ठिकाणाहून स्पर्धक येत असतात. विजेत्या स्पर्धेकांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिक देण्यात येते. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संत खंडोजी महाराज यात्रा उत्सव रद्द करण्यात आला. यामुळे तरुण युवकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. असे असले तरी पुढील वर्षी येणारा यात्रोत्सव हा जोमाने व उत्साहाने साजरा करु, असा निश्चय गावातील व्यक्तींनी केला आहे.
(माहिती संकलन – अक्षय कोठावदे, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे)