निलेश गौतम, डांगसौंदणे (ता. बागलाण)
तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी विलास बिरारी यांची एकुलती कन्या असलेल्या सलोनीला ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी अतिविषारी सर्पाने दंश केला. गेल्या १२ दिवसांपासून सलोनी मृत्यूशी झुंज देत होती. मात्र ही झुंज अखेर अपयशी ठरली आणि मृत्यूचा विजय झाला. सलोनीच्या मृत्यूमुळे परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
दिवाळ सणानिमित्त देवळा तालुक्यातील मामाचे गाव असलेल्या निबोंळा येथे सलोनी ही १५ नोव्हेंबर रोजी आपल्या आई व लहान भाऊ सोबत गेलेली होती. मामा तुषार निकम यांचे घरी सायंकाळी उशिरा पोहचलेल्या सलोनीसाठी मामाचे घर काळच ठरले. आई, भाऊ, मामा-मावशी आणि मामाच्या परिवारासोबत सलोनी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत झोपी गेली. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अचानक मण्यार जातीचा अतिविषारी साप सलोनीसाठी काळ बनून आला. सापाने सलोनीच्या हाताला दंश केला. त्याची जाणीव होताच सलोनीने झोपेतून तात्काळ उठत घरातील सर्वांना माहिती दिली. मामा आणि सर्व परिवाराने क्षणाचाही विलंब न करता दाभाडी शासकीय रुग्णालय गाठले. सोबत सर्पदंश केलेल्या सापाचे फोटोही मोबाईल मध्ये कैद केले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ते दाखवले. मात्र अतिविषारी साप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि तिला मालेगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्याचदिवशी सकाळी सलोनीला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यासाठी मालेगावच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात गेली १२ दिवस डॉक्टर आणि कुटुंबाचे शर्थीचे प्रयत्न अखेर शनिवारी (२८ नोव्हेंबर) निष्फळ ठरले. संपूर्ण रक्तात विष पसरल्याने मेंदूचे कार्य थांबले (ब्रेन डेड) थांबले व तिचा दुर्देवी मृत्यू झाला. सलोनीच्या या निधनाने केवळ बिरारी कुटुंबावर आघात झालेला नाही तर या घटनेने संपूर्ण परिसरातच शोककळा पसरली आहे. हुशार आणि तितकीच मनमिळाऊ असलेल्या सलोनीच्या मृत्यूमुळे पंचक्रोशीतून श्रद्धांजली व्यक्त होत आहे.