मुंबई – राज्यातले गोरगरीब, शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी सुरु केलेल्या शिवभोजन योजनेचा आतापर्यंत राज्यातल्या २ कोटी नागरिकांनी लाभ घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘शिवभोजन योजना – महत्वकांक्षी कार्यक्रम’ या विषयावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. हा कार्यक्रम राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शनिवार १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या ॲपवरही याच वेळेत ऐकता येईल.
या विशेष कार्यक्रमात शिवभोजन योजना, कोरोना काळात ही थाळी पाच रुपयात उपलब्ध करून दिली, या योजनेचा तालुकास्तरावर करण्यात आलेला विस्तार, टाळेबंदी व टाळेबंदी कालावधीनंतर योजनेची वाढवलेली व्याप्ती व लाभार्थ्यांनी घेतलेला लाभ, गरीब व गरजू यांचा या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद अशा विविध विषयांवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सविस्तर माहिती दिली आहे