महिला बालकल्याण सभापती आर्कि.अश्विनी आहेर यांनी दिली माहिती
नाशिक – अंगणवाडी सेविका पदावर त्याच गावातील वय, अनुभव व शैक्षणिक पात्रताचे आधारे नाशिक जिल्ह्यातील १४९ पात्र अंगणवाडी मदतनीस यांना पदोन्नती आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद सभागृहात अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जि.प.महिला व बालकल्याण सभापती आर्कि अश्विनी अनिलकुमार आहेर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य. अधिकारी लीना बनसोड, महिला व बालविकास अधिकारी दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांचे हस्ते पदोन्नती आदेश देऊन थेट अंगणवाडी सेविका पदावर नियुक्ती देण्यात आल्याची माहिती महिला बालकल्याण सभापती आर्कि.अश्विनी आहेर यांनी दिली .
गेल्या ५ वर्षांपासून अंगणवाडी सेविका – मदतनीस भरती व पदोन्नतीवर बंदी होती.आता पदोन्नती प्रक्रिया सुरू झाली असल्याने ५ वर्षानंतर गावपातळीवर सेवा देणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी वरील अन्याय दूर झाल्याचे सभापती आहेर यानी सांगितले. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व महिला व बालविकास अधिकारी दीपक चाटे यांनी बालविकास अधिकारी व कर्मचारी यांचे कडून युद्ध पातळीवर प्रस्ताव छाननीचे काम करून घेतल्यामुळेच हे शक्य झाले असे सभापती अश्विनी आहेर यांनी सांगितले. प्रस्तावाची छाननी व तपासणी बालविकास अधिकारी, महिला बालविकास जिल्हा कार्यालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र शिंदे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र देसाई, कनिष्ठ लिपिक के.व्ही.काळोगे, वरिष्ठ लिपिक उमेश राजपूत यांचे सहकार्य मिळाल्याचेही त्या म्हणाल्या.