नाशिक – भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्याशस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी स्पष्टता देणारे राजपत्र नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या राजपत्राला विरोध करण्याकरिता ११ डिसेंबर रोजी संपाचे आवाहन केले आहे. या संपामध्ये आयुष डॉक्टर सहभागी होणार नसल्याचा एकमुखी निर्णय आयुष कृती समितीने घेतला आहे.
आयुष कृती समिती स्थापन
भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांच्या राष्ट्रव्यापी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) संघटनेने आवाहन केल्यानुसार आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन आयुष कृती समिती या नावाने शिखर संघटनेची स्थापना केली आहे. आयुष कृती समितीच्या झेंड्याखाली सर्व संघटना आगामी काळात एकदिलाने काम करतील असा देखील निर्णय बैठकीमध्ये करण्यात आला आहे.
गुलाबी फीत लावणार
सदर राजपत्राचे स्वागत करण्याकरिता निमा केंद्रीय शाखेने आखलेल्या कार्यक्रमानुसार देशात वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषद घऊन आपली भूमिका मांडणे, विविध बॅनर्स पोस्टर्स आपल्या दवाखान्यात/हॉस्पिटल्स मध्ये लावणे त्याचबरोबर ११ तारखेला राज्यातील १,५०,००० पेक्षा अधिक आयुष डॉक्टर्स गुलाबी फीत लावून वैद्यकीय सेवा नियमितपणे देतील. सोबतच सदर राजपत्र प्रकाशित केल्याबद्दल केंद्र शासनाचे व भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अभिनंदन करणारे व पाठिंबा देणारे पत्र सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना आयुष कृती समितीकडून देण्यात येईल असा देखील आयुष कृती समितीच्या बैठकीत निर्णय करण्यात आला आहे.
कायदेशीर अडसर दूर
या राजपत्रामुळे गत अनेक वर्षांपासून विहित अभ्यासक्रमानुसार शिक्षणादरम्यान प्राप्त प्रशिक्षणाच्या आधारावर शस्त्रक्रिया करणाऱ्या शल्य व शालाक्यतंत्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या सेवेमधील कायदेशीर अडसर दूर झाला असून शस्त्रक्रियेसंबंधीची व्याप्ती अधिक सुस्पष्ट झाली आहे. या राजपत्रामुळे ग्रामीण व शहरांमधील आर्थिक दृष्टीने कमकुवत भागात कायद्याच्या चौकटीत तीन वर्षाचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विविध शस्त्रक्रियांच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या पदव्युत्तर डॉक्टरांचा कायदेशीर अधिकार अधिक अधोरेखित झाला आहे. आयूष कृती समितीने सदर राजपत्राचे स्वागत केले असून त्यास पाठिंबा दिला आहे. या राजपत्रामुळे आयुर्वेदाच्या विकासाला अधिक चालना मिळणार असून आयुर्वेदाला राजाश्रय मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.
या संपूर्ण विषयाची माहिती निमा नाशिकच्या अध्यक्षा डॉ.जयश्री सूर्यवंशी, सचिव डॉ वैभव दातरंगे , खजिनदार डॉ प्रतिभा वाघ, केंद्रीय पदाधिकारी डॉ. शैलेश निकम, डॉ मनीष जोशी, निमा महाराष्ट्र राज्य खजिनदार डॉ भूषण वाणी, प्रवक्ता डॉ तुषार सूर्यवंशी, डॉ अनिल निकम, डॉ. राहुल पगार, डॉ, देवेंद्र बच्छाव,डॉ मनीष हिरे, डॉ प्रणीता गुजराथी, डॉ दीप्ती बढे यांनी दिली.