नाशिक – अंजनेरी राखीव वन संवर्धन अंतर्गत सुरु झालेल्या ‘अंजनेरी वाचवा’ अभियान सुरु करण्यात आले आहे. शहरातील निसर्गप्रेमी, गिर्यारोहक यांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभागी झाले आहेत. अभियानांतर्गत ४८ तासात १० हजार पेक्षा जास्त निसर्गप्रेमींनी ऑनलाईन विरोध नोंदवला आहे. अंजनेरी येथील जैवविविधतेचा ऱ्हास होऊ नये यासाठी नाशिककर एकत्र आहे आहेत. फेसबुक तसेच संबंधित सोशल मीडियावर या बाबत जनजागृती केली जात आहे. १४ किलोमीटरचा रस्ता झाल्यास मोठ्या प्रमाणात दुर्मिळ वनस्पती नामशेष होण्याच्या काळजीने सोशल मीडियावर या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
महाराष्ट्रातील विविध शहरांमधून ४८ तासांत १० हजार पेक्षा जास्त अंजनेरी प्रेमींनी या निर्णयाला ऑनलाईन विरोध दर्शवला आहे. शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी नेटीझन्सने डिजिटल अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. शहरातील निरनिराळ्या निसर्गप्रेमी संस्थांनी या मोहिमेस पाठिंबा दर्शवला आहे. संस्थांच्या माध्यमातून देखील सोशल मीडियावर जनजागृती केली जात आहे. मुळेगावातून थेट माथ्यापर्यंत १४ किलोमीटरचा रस्ता नेण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाला पाठवला आहे. या रस्त्याचा उद्देश पर्यटनविकास असा सांगितला जात असला तरी यातून होणाऱ्या वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधतेला हानी पोहोचू शकते अशी भूमिका निसर्गप्रेमींनी घेतली आहे. स्फोटकांचा वापर केल्यास दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याची शक्यता निसर्गप्रेमींनी वर्तवली आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी http://bit.ly/save_anjaneri_wa येथे नोंदणी करा.