नवी दिल्ली – दक्षिण अफ्रिकेविरोधात सुरू असलेल्या एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. यजमानांनी हा सामना १७ धावांनी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिकेने कर्णधार तेंबा बवुमाच्या ९२ आणि क्विटन डी कॉकच्या ८० धावांच्या जोरावर ६ गडी बाद ३४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ९ गड्यांच्या मोबदल्यात ३२४ धावा करू शकला. १९३ धावा कुटणाऱ्या फखर जमांला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
पाकिस्तान क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमानांच्या संघाकडून डी कॉक आणि डीन एल्गर यांनी ५५ धावांची भागिदारी केली. त्यानंतर कर्णधार बवुमाने डावाला सावरले आणि धावफलक हलता ठेवून १६९ धावापर्यंत पोहोचवले. डी कॉक ८० धावा काढून बाद झाला. बवुमाचे शतक ८ धावांनी हुकले. वान डे डुसेन आणि डेव्हीड मिलर यांनी धडाकेबाज फलंदाजी करून अर्धशतके केली. अशा रितीने अफ्रिकेच्या संघाने ६ गडी गमावून ३४१ धावांचा डोंगर उभारला.










