मुंबई – कोरोनाचा प्रकोप वाढत असताना देशभरात लॉकडाऊन घोषित झाले आणि वाहतूकही थांबली. विमानसेवा, रेल्वेसेवाही पूर्णपणे थांबली. अशात तब्बल १०८ वर्षे जुनी पंजाब मेलदेखील बंद झाली. मुंबई ते फिरोजपूर या दरम्यान धावणारी पंजाब मेल आता २५५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा ट्रॅकवर आली आहे. १ डिसेंबरला मुंबईवरून फिरोजपूरला ही गाडी रवाना झाली आणि ३ डिसेंबरला फिरोजपूरहून मुंबईसाठी रवाना होणार आहे. त्यानंतर नियमीत वेळापत्रक असेल.
पंजाब मेलसाठी रिझर्व्हेशन सुरू झाले आहे. रेल्वे प्रशासनाने लांबलचक ब्रेकनंतर रंगरंगोटी आणि सजावटीसह पंजाब मेलला ट्रॅकवर उतरविले आहे. त्यामुळे साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या गाडीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. फिरोजपूर ते मुंबई या मार्गावर भारतीय सैनिकांच्या अनेक छावण्या आहेत. त्यामुळे सैनिकांसाठी ही गाडी उपयुक्त ठरते. याशिवाय दिल्लीला ये-जा करणाऱ्या अधिकारी आणि व्यापारी वर्गासाठी देखील या गाडीने प्रवास करणे सोयीचे ठरते.
१ जून १९१२ मध्ये पहिल्यांदा ही गाडी धावली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात बल्लार्ड पियर रेल्वे स्टेशन ते पेशावर (आता पाकिस्तानमध्ये) या दरम्यान ही गाडी धावत होती. स्वातंत्र्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते फिरोजपूर असा प्रवास सुरू झाला आणि तो आजतागायत सुरू आहे. सुरुवातीला ब्रिटीश अधिकारी, सरकारी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी ही गाडी सुरू करण्यात आली होती. १९३० मध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी ही गाडी खुली करण्यात आली. तेव्हापासून पंजाब मेलने भारतीयांच्या ह्रदयात स्थान मिळवले आहे.