नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतामध्ये राबविली जात असून आता सर्वसामान्यांसाठीही लस देण्यात येत आहे. बेंगळुरूमध्ये एका १०३ वर्षाच्या जय कामेश्वरी या आजीबाईंनी कोरोना लसचा पहिला डोस घेतला आहे. लस घेणारी ती भारतातील सर्वात वयस्कर महिला ठरली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोविड -१९ पासून संरक्षणाकरिता देशभरातील लसीकरणात आतापर्यंत २ कोटी ४० लाख लोकांना लसी देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने १ मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू केल्याने विविध राज्यांमधील लसीकरण अभियान गतिमान करण्यावर भर देत आहे. या टप्प्यात, गंभीर आजार असलेले ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक कोविड -१९ लसची नोंदणी करुन डोस घेऊ शकतात.
एका अधिकृत प्रसिद्धीस आलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार देशभरात कोविड -१९च्या ५३ व्या दिवशी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण १० लाख २८ हजार ९११ डोस देण्यात आले. यातील ७ लाख ९८ हजार ३५४ लाभार्थ्यांना पहिल्या डोससाठी लसीकरण करण्यात आले आणि २ लाख ३० हजार ५५७ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.