नाशिक – एप्रिल व मे महिन्यात इयत्ता 10 वीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा आणि उच्च माध्यमिक 12 वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा काळात विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी सहायक सचिव तथा सहसचिव(प्र.) मंदाकिनी देवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्य.शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, नाशिक विभागीय मंडळाचे कार्यकक्षेतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, दिव्यांग विद्यार्थी, पालक यांच्या मदतीसाठी सहायक सचिव मंदाकिनी देवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, दिव्यांग विद्यार्थी, पालक यांनी काही अडचणी आल्यास किंवा संबंधित परीक्षेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सहायक सचिव मंदाकिनी देवकर यांचेशी 7755903427,8888339423 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्य शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक, गट/सर्व्हे नं.1560/1 आडगांव शिवार, न्यु इंग्लिश स्कुल जवळ मुंबई आग्रारोड, नाशिक येथे या कार्यालयाच्या पत्त्यावर देखील संपर्क करु शकता, असेही विभागीय सचिव श्री. अहिरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.