मनाली देवरे, नाशिक
राजस्थान रॉयल्सचा ५७ धावांनी दणदणीत पराभूत करून मुंबई इंडियन्स ने विजयाची हॅट्ट्रिक साधली. १९३ धावांचा पाठलाग करतांना राजस्थान राॕयल्स १८.१ षटकात १३६ धावात सर्वबाद झाले. या विजयानंतर मुंबई इंडीयन्सने आपला नेट रनरेट आता अधिकच मजबूत करुन घेतला असून त्या आधारावर आठ गुणांसह गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
बुमराहचे ४ बळी
एकट्या जाॕस बटलरचा अपवाद सोडला तर राजस्थानचे सगळेच फलंदाज आज मुंबईच्या माऱ्यासमोर अक्षरशः ढेपाळले. आत्तापर्यंत सीझनमध्ये सर्वाधिक डॉट बाॕल टाकणाऱ्या जसप्रीत बुमराहने आपल्या निर्धारित ४ षटकात ४ बळी घेऊन राजस्थान राॕयल्सला डोके वर काढण्याची संधीच मिळू दिली नाही. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारण्याचा या स्पर्धेतील एक अपारंपारिक निर्णय आज रोहित शर्माने घेतला आणि त्या निर्णयाला मुंबई इंडीयन्सच्या खेळाडूंनी न्याय दिला.
फलंदाजीत सुर्यकुमार तळपला
क्विंटन डीकॉक आणि रोहित शर्मा यांनी वेगाने धावा करून अर्धशतकी सलामी दिल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या सुर्यकुमार यादवने आज मुंबई इंडियन्स साठी एक अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली. रोहित शर्मा आणि ईशान किशन हे दोन्ही तगडे फलंदाज दोन चेंडूत एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने एक बाजू लावून धरली. स्वतःच्या वैयक्तिक ५० धावा होईपर्यंत अगदी क्रिकेटच्या पुस्तकात लिहिलेले फटके तंत्रशुद्धपणे मारणाऱ्या याच सुर्यकुमारने नंतर मात्र संघाची धावगती वाढवण्याची गरज लक्षात घेऊन, आपल्या फलंदाजीत एकदम टाॕप गिअर टाकला आणि पुस्तकाबाहेरचे फटके मारून १६८ च्या सरासरीने ४७ चेंडूत ७९ धावा केल्या. हार्दिक पांड्याने १९ चेंडूत ३० धावा केल्या आणि त्यामुळे १९३ धावांचे एक मजबूत आव्हान मुंबई इंडियन्सने राजस्थान समोर ठेवले. खरंतर मुंबई इंडियन्स आज २०० च्या पुढे धावसंख्या खेचणार असे वाटत असतानाच श्रेयस गोपाल आणि जोफ्रा आर्चर यांच्यासोबत नव्या दमाचा कार्तिक त्यागी यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केल्याने १९३ धावात त्यांचा डाव आटोपला.
बुधवारचा सामना
५ सामन्यात ३ पराभव झेलणारा आणि क्षमता असतांना देखील चाचपडत स्पर्धेची सुरुवात करणारा चेन्नई सुपर किंग्ज, आपल्या ४ सामन्यात २ पराभव झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स सोबत बुधवारी भिडणार आहे. आयपीएल स्पर्धेची संपुर्ण रचना ही साखळीतल्या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. साखळीतून प्ले ऑफ मध्ये पोहोचायचं असेल तर, ‘काहीही झालं तरी हा सामना आपण जिंकलाच पाहिजे’ अशी स्ट्रॅटेजी काही संघाविरुध्द आधीपासून ठरवली जाते. रणनिती लिहून ठेवलेल्या चेन्नईच्या डायरीत कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द विजय आणि २ गुण मिळवलेच पाहीजेत हे कदाचित अधोरेखित करुन लिहून ठेवलेले असेल.