मुंबई – कोरोनाचे गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घरातच रहावेत यासाठी महानगरांमधील हाऊसिंग सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार देण्याचा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश धक्कादायक आहे. सरकारने आपली जबाबदारी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर ढकलून सोसायट्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग करू नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी केले.
मा. माधव भांडारी म्हणाले की, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व नागरिक आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. शहरांमधील हाऊसिंग सोसायट्यांमध्येही लोक एकमेकांना मदत करतात आणि त्यामध्ये पदाधिकाऱ्यांचेही सहकार्य असते. तथापि, अध्यक्ष व सचिवांना विशेष पोलीस अधिकाऱ्याचे अधिकार देण्यामुळे सध्याच्या सहकार्याला वेगळे वळण लागून सोसायट्यांमध्ये तणावाचे प्रसंग निर्माण होतील. गेले वर्षभर कोरोनामुळे हैराण झालेल्या समाजात आणखी अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रकार सरकारने करू नये.
ते म्हणाले की, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे. तथापि, प्रत्यक्षात शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सातत्याने आपली जबाबदारी इतरांवर ढकलण्याचा आणि इतरांवर दोषारोप करण्याचा प्रयत्न करत असते. सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांवर जबाबदारी ढकलणे हा त्याचाच एक भाग आहे.