नाशिक – नाशिक रोड येथील पंच शिवारातील अमृत वन आणि सह्याद्री नगर मधील उद्यान सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळेच त्याचीच शहरात सध्या चर्चा होत आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ अंतर्गत नाशिकरोड येथे उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत प्रभाग क्र. १८ मधील पंचक शिवारातील अमृत वन उद्यानाचे रुपडे बदलले आहे. टाकाऊ वस्तूंपासून जसे की जुन्या टायरांचा वापर करुन टायरवर आकर्षक अशी पेंटींग करण्यात आली. सदरच्या टायरमध्ये लालमातीचा भराव करुन त्यामध्ये हिरवळ (लॉन) तसेच शेाभिवंत रोपे लागवड करुन उद्यानाचे आकर्षण वाढविण्यात आले आहे. तशी माहिती विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी दिली आहे.
नाशिकरोड येथील उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत प्रभाग क्र. १७ मधील सह्याद्रीनगर येथील उद्यानात टाकाऊ वस्तूंपासून जसे कि प्लास्टीक बॉटल तसेच जुने टायरांचा वापर करुन टायरवर आकर्षक पेंटींग करण्यात आली. तसेच सदर टायरमध्ये लालमातीचा भराव करुन आकर्षक अशा शोभिवंत रोपांची लागवड करण्यात आली. तसेच प्लास्टीक बॉटलला रंगरंगोटी करुन त्यामध्ये आकर्षक फुलांची रोपे लागवड करुन सदरच्या बॉटल ह्या उद्यानाच्या कंपाऊन्ड वॉलच्या चेनलींगवर लावून सुशोभिकरण करण्यात आल्यानंतर लागलीच स्थानिक नागरीकांनी सदरचे नाविण्य पुर्ण काम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.