संबलपूर – डॉक्टर हा रुग्णांसाठी देवदूत नव्हे तर देव असतो असे म्हणतात, ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यात असे एक डॉक्टर गरीब रुग्णांसाठी जणू काही देवच आहेत. गरीब आणि वंचितांना उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी एक क्लिनिक उघडले असून त्यांची फी आहे, फक्त एक रुपया.
वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च’ चे औषध विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. शंकर रामचंदानी ( वय 38 ) यांनी बुर्ला शहरात हे क्लिनिक उघडले आहे, जिथे रूग्णांना उपचार घेण्यासाठी फक्त एक रुपयांची फी भरावी लागत आहे. याबाबत रामचंदानी म्हणाले की, गरीब व वंचितांसाठी मोफत उपचार देण्याची त्यांची इच्छा होती.आता या क्लिनिकच्या मार्फत ही इच्छा पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.
अलीकडेच मला सहाय्यक प्राध्यापकपदावर पदोन्नती देण्यात आली आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून मला येथे काम केल्यानंतर खाजगी क्लिनिकमध्ये काम करण्याची परवानगी मिळाली आहे, म्हणून आता मी स्वत: चे क्लिनिक भाड्याच्या घरात सुरु केले आहे.
मी गरिब व वंचितांकडून एक रुपया घेतो, कारण विनामूल्य सेवा देत आहेत, असे मला वाटत नाही. तसेच रुग्णांना असे वाटले पाहिजे की, त्यांनी उपचारासाठी काही रक्कम दिली आहे. रामचंदानी यांची पत्नी शिखा रामचंदानी दंतचिकित्सक असून या कामात त्यांना मदत करत आहेत.