नवी दिल्ली – भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेपाळला भेट देणार असून या उच्चस्तरीय भेटीदरम्यान नेपाळ सरकार जनरल नरवणे यांना नेपाळ लष्कराचे जनरल हे मानद पद देऊन त्यांचा सन्मान करणार आहे.
सदर पारंपरिक सन्मान हा दोन देशांच्या सैन्या दरम्यानच्या दृढ संबंधाची ओळख म्हणून दिला जाणारा आहे. नेपाळचे अध्यक्ष विद्या देवी भंडारी याच्या हस्ते हा सन्मान जनरल नरवणे यांना एका समारंभात देण्यात येणार आहे. हा सन्मान १९५० मध्ये सुरू करण्यात आला. ‘जनरल ऑफ इंडियन आर्मी’ या मानद रँकद्वारे नेपाळ आपल्या लष्करप्रमुखांचा गौरव करत आहे. जुन्या परंपरेनुसार हा सन्मान देण्याचा नेपाळचा निर्णय अलीकडच्या काही महिन्यांत दोन्ही शेजारच्या देशांमधील सीमा विवादांवरून खूप महत्त्वाचा मानला जात आहे .पुढील महिन्याच्या सुरुवातीस सेनाप्रमुख नेपाळला भेट देतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अद्याप दौऱ्याच्या तारीखा जाहीर केल्या गेलेल्या नाहीत. नेपाळ दौर्यावर जनरल नरवणे सेनापती जनरल पूर्ण चंद्र थापा आणि संरक्षण मंत्री ईश्वर पोखरेल यांच्यासह नेपाळी सैन्याच्या इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. या दौर्यावर दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
दरम्यान, काठमांडूतील नेपाळी लष्कराच्या प्रवक्त्यानेही जनरल नरवणे यांची भेट ही फेब्रुवारीला होणार असल्याची पुष्टी केली होती, परंतु दोन्ही देशांमध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आले होते.
दरम्यानच्या काळात कैलास मानसरोवरला भेट देण्यासाठी बांधलेला हा रस्ता आपल्या सीमेवरुन जात असल्याचा नेपाळचा दावा केला होता. तथापि, रस्ता भारतीय सीमेत होता असा दावा भारताने फेटाळला.
यानंतर नेपाळने मेमध्येच आपला नवीन राजकीय नकाशा जाहीर केला आणि उत्तराखंडमधील लिपुलेख, कलापाणी आणि लिंपियाधुरा भागात आपला वाटा दाखविला. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. यानंतरही भारताच्या सीमेवर नेपाळची वृत्ती बर्याच ठिकाणी आक्रमक झाली आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्लीहून नेपाळची ही पहिली उच्चस्तरीय भेट आहे, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे.