रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, भारतीय रेल्वेच्या लक्षात आले आहे की, ““अव्हेस्ट्रेन इन्फोटेक” नावाची संस्था, जिचे संकेतस्थळ www.avestran.in आहे, या संस्थेने ८ ऑगस्ट रोजी एका प्रमुख दैनिकात जाहीरात प्रसिद्ध केली आहे. रेल्वेतील ५२८५ जागांसाठी ११ वर्षांच्या कंत्राटावर नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जदाराला ७५० रुपये ऑनलाईन शुल्क भरावयास सांगण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर आहे. यासंदर्भात, असेही स्पष्ट करण्यात येते की, रेल्वेच्या गट ‘सी’ आणि ‘डी’ गटाची भरती रेल्वेच्या २१ रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) आणि १६ रेल्वे भरती कक्ष (आरआरसी) यांच्याकडून केली जाते, कोणत्याही खासगी संस्थेकडून नाही. भारतीय रेल्वेतील नोकरभरतीला केंद्रकृत रोजगार समाचारच्या माध्यमातून सर्वदूर प्रसिद्धी दिली जाते, असेही रेल्वेने सांगितले आहे.
चौकशी सुरू; कारवाई होणार
देशभरातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जातात. एम्प्लॉयमेंट न्यूज/रोजगार समाचारच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीसंदर्भात राष्ट्रीय वर्तमानपत्रे आणि स्थानिक वर्तमानपत्रांना सूचक सूचना दिली जाते. तसेच जाहिरात आरआरबी/आरआरसीच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाते. आरआरबी/आरआरसीच्या संकेतस्थळाचा उल्लेख जाहिरातीत नमूद असतो. पुढे आणखी स्पष्ट करण्यात येते की, रेल्वेने भरतीसंदर्भात कोणत्याही खासगी संस्थेला अधिकार दिले नाहीत, जसे वर नमुद केलेल्या जाहिरातीत नमूद केले आहे. रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या संस्था/व्यक्तींविरूद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.