नाशिक – रेम्डिसीविर इंजेक्शनचा तुटवडा व रूग्णांची होणारी पायपीट तसेच त्याच्या उपलब्धतेबाबत पारदर्शकता यावी या हेतुने जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक मेडिकल दुकानावर रेम्डिसीविर च्या उपलब्ध साठ्याची व किमतीची माहिती रुग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध होत आहे. परिणामी, पारदर्शकतेसोबतच त्याच्या वितरणात सुसुत्रता आल्याचा दावा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केला आहे.
मांढरे म्हणाले की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेम्डिसीविर चा तुटवडा व काळाबाजार होत असल्याची माहिती प्रसारमाध्यमातून येत होती. त्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करुन त्यांना भरारी पथकासाठी मनुष्यबळ व वाहनही अधिग्रहित करुन देण्यात आले होते. त्यांनंतर ज्या औषधालयांमध्ये ही उपलब्ध आहेत त्यांचीही यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सध्या भरारी पथक प्रत्येक औषधालय/ हॉस्पिटल्स ला भेट देत असून तेथे उपलब्ध साठ्याची माहिती, त्याप्रमाणे साठा, झालेली विक्री यांची शहानिशा करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रेम्डिसीविर चा पुरेसा साठा रूग्णांना वेळेवर उपलब्ध होत असून तक्रारींचे प्रमाणही कमी झालेले आहे. असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये औषध पुरवठा व ऑक्सिजन च्या बाबतीत कुठलीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही. साठेबाजी करणारे व काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. आज जास्तीत जास्त कोविड रुग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी कोविड रुग्णालयाशी संलग्न एकूण ५० मेडीकल स्टोअरमध्ये २ हजार ३६८ रेम्डिसीविर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच आज एकूण १ हजार ६६६ नवीन इंजेक्शन पुन्हा मिळाले आहेत. ज्या रूग्णांना किरकोळ स्वरूपात रेम्डिसीविर ची आवश्यकता असल्यास त्यांनी वोक्हार्ट हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, अशोका हॉस्पिटल यांच्या औषधालयांमध्ये ते उपलब्ध आहेत.
तर येथे तक्रार करा
रेम्डिसीविर चा काळाबाजार होत असेल किंवा यासंदर्भात तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाईन क्रमांक 9766811279 व 8780186682 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.