प्रयागराज (उत्तर प्रदेश) – मौनी अमावस्येमुळे प्रयागराज येथे पवित्र स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. अशा परिस्थितीत प्रियंका गांधी- वड्रा आणि त्यांची मुलगी मिरया यांना संगमापर्यंत तसेच मंदिर आणि आश्रमापर्यंत पोहोचणे कठीण होते. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत मदत केल्यामुळेच प्रियंका गांधी यांचा हा दौरा यशस्वी झाला.
वास्तविक, मौनी अमावस्येमुळे भाविकांची गर्दी असल्याने प्रियंका यांना संगमापर्यंत पोहोचणे कठीण होते. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे द्वारका शारदा पीठाच्या शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्या आश्रमात जाण्याची देखील समस्या होती. कारण मनकामेश्वर मंदिर परिसर आश्रम हा सैन्य छावणी क्षेत्राचा एक भाग असून येथून जाण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी लागते. तसेच सैन्याने येथील दरवाजेदेखील बंद केले असून सर्वसामान्यांना येण्याजाण्यावर बंदी आहे.










